पुरोगामी संघटनांकडून पिंपरीत मनुस्मृतीचे दहन..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २५ डिसेंबर २०२४ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड याठिकाणी मनुस्मृतीचे दहन केले. या सामाजिक क्रांतीच्या घटनेच्या स्मृतिदिनानिमित्त भीमसृष्टी स्मारकासमोर सर्व पिंपरी चिंचवड शहरातील पुरोगामी संघटनांच्या वतीने मनुस्मृतीचे दहन करून एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त करण्यात आला.
“जातीय विषमता, चातुर्वर्ण व्यवस्था, माणसा माणसात भेदभाव, स्त्रियांना अतिशय तुच्छ दर्जाची वागणूक देणे आणि इतरही अनेक अशा एकंदरीत अमानविय अशा मानवनिर्मित तात्कालीन व्यवस्था कायदा असणाऱ्या मनुस्मृतीचे दहन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक मोठी सिंहगर्जना आणि सामाजिक क्रांतीच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलले होते या घटनेच्या स्मरणार्थ गेल्या दहा वर्षापासून आम्ही हे मनुस्मृति दहन सालाबादाप्रमाणे करत आहोत”
असे आयोजक आणि ज्येष्ठ सामाजिक चळवळीचे नेते मानव कांबळे यांनी यावेळी सांगितले.
पुरोगामी संघटनांच्या वतीने या विषारी विशवल्ली रुपी असलेल्या मनुस्मृतीचे मुखपृष्ठ जाळून त्याचे दहन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या मनुस्मृति दहनाला अभिवादन आणि या मनुस्मृतिचा धिक्कार, निषेध नोंदविण्यात आला.
याप्रसंगी मानव कांबळे, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, छावा युवा मराठा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, वैभव जाधव, बहुजन सम्राट सेनेचे संतोष निसर्ग़ंध, भिमशाही युवा संघटनेचे शिवशंकर उबाळे, बौद्ध समाज विकास महासंघाचे शरद जाधव, वसंत साळवे, डॉ.पवन साळवे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बाळासाहेब घस्ते, रोहिणी कांबळे, नागरी हक्क सुरक्षा समितीचे प्रदीप पवार, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र बनसोडे, नरेंद्र पोटे, दिलीप काकडे, संजय गायकवाड, श्रीमती मंगला मुनेश्वर, निशा काळे, निलम सांडभोर, संजिवनी मांजरे, संगिता शेलार, आशा बोरकर, संगीता वानखेडे, आशा सरवदे, जितेंद्र छाबडा यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.