महापालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस आणि माजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…
प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. २३ जानेवारी २०२५ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उपलेखापाल अंकुश कदम, अनिल कुऱ्हाडे, सागर देवकुळे यांच्यासह विविध विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक होते. धैर्य, त्याग आणि देशभक्तीचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्या ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्है आजादी दुंगा..’, ‘चलो दिल्ली..’, या घोषवाक्यांनी संपुर्ण देशवासियांच्या मनामध्ये स्वातंत्र्यलढ्याचे बीज पेरले गेले होते. त्यांची देशभक्ती आणि स्वतंत्र रणसंग्रामातील कारकीर्द आजच्या तरुणांना प्रेरणा देणारी आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संयुक्त मराठी आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन महाराष्ट्रातील मराठी लोकांना एकत्र आणण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. मुंबईला महाराष्ट्राची राजधानी बनविण्यासाठी देखील त्यांनी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले तसेच दैनिक सामना, साप्ताहिक मार्मिक यांची स्थापना करून लेख, व्यंगचित्र याद्वारे निर्भिडपणे आपले मते मांडून समाजप्रबोधन करण्याचे कामही त्यांनी केले.