
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १७ मार्च २०२५ इंद्रायणी नदी कायमच फेसाळते. जलपर्णीने इंद्रायणीला विळखा घातला आहे. त्यातच पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस काढली की इंद्रायणी नदीचे पाणी वारकऱ्यांना पिण्यास आणि स्वयंपाकासाठी वापरण्यास सक्त मनाई आहे. तुकाराम बीजनिमित्त लाखो भाविक देहूला येतात पण यावर्षी ते इंद्रायणी नदीला हातसुद्धा लावू शकणार नाहीत किंवा त्यात अंघोळ करू शकणार नाहीत.
या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर प्रवक्ते माधव पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पाटील यांनी समाज माध्यमांवर पोस्ट लिहीत फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात पाटील लिहितात कि आजच्या दिवशी तुकाराम महाराज वैकुंठवासी झाले. पण जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ,राजकारणी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आपली इंद्रायणी नदी सुद्धा वैकुंठवासी झाली आहे.
भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आणि पिंपरी चिंचवड शहर भाजपने इंद्रायणी नदीच्या नावाखाली करोडो रुपयांचे अनेक इव्हेंट घेऊन किमान नदीचे नाव चर्चेत ठेवले. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुद्धा वेळोवेळी इंद्रायणी नदीसाठी करोडो रुपयाचे टेंडर काढून नदीसाठी प्रयत्न केले, का नेत्यांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न केले हे त्यांचे त्यांनाच माहीत.
असो, तरीही आमदारांचा आणि पालिका आयुक्तांचा राजीनामा अजिबात घेऊ नका. पण जिल्हाधिकाऱ्यांचा हा आदेश म्हणजे वारकऱ्यांची अस्मिता असणाऱ्या इंद्रायणी नदीचा, खांद्यावर त्याग, पावित्र्य, बलिदान आणि सेवा यांची भगवी पताका घेऊन मिरवणाऱ्या करोडो वारकऱ्यांचा विश्वासघात आहे.
महाराष्ट्र शासन, पुणे जिल्ह्यातील नेते, पिंपरी चिंचवड शहरातील नेते आणि प्रशासन इतक्या दिवस झोपले होते काय? साहेब ,लाखो वारकऱ्यांच्या अस्मितेचा आणि जीवाचा प्रश्न आहे . मुख्यमंत्री साहेब आपणसुद्धा याकडे दुर्लक्ष केले. अरेरे वाईट वाटले.
तरी या सर्वांची जबाबदारी घेऊन आपण त्वरित राजीनामा द्यावा असे माधव पाटील म्हणाले.



