महापालिकेच्या ताफ्यात दोन नवीन रिसायकल वाहने दाखल – मलनिःसारण व्यवस्थेला नवे बळ

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०४ मार्च २०२५ महापालिकेच्या मलनिःसारण यंत्रणेला आधुनिक रीसायकल वाहने प्राप्त झाल्यामुळे शहरातील सांडपाणी व्यवस्थापन अधिक जलद, प्रभावी आणि कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे. ही यंत्रणा आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सुस्थितीत व सातत्याने कार्यरत रहावी यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. शिवाय यामुळे स्वच्छता, आरोग्य आणि नागरी जीवनमानात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या नगर परिषद संचालनालयामार्फत पिंपरी चिंचवड महापालिकेस ८ टन व १८ टन क्षमतेची एक संच स्वरूपात दोन अत्याधुनिक रीसायकल वाहने मोफत स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील मलनिःसारण व्यवस्थेची कार्यक्षमता आणि प्रतिबंधात्मक साफसफाई अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने ही वाहने महत्वपुर्ण ठरणार आहेत. या नव्याने दाखल झालेल्या वाहनांचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खराटे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
या उद्घाटन प्रसंगी मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता राजेंद्र जावळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सुनिल बेळगावकर तसेच महापालिका कर्मचारी उपस्थित होते.
रिसायकल वाहनांच्या मदतीने शहरातील सांडपाणी वाहिन्यांमध्ये होणारे अडथळे वेळीच दूर करता येणार असून, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या जलतरणाच्या समस्यांवरही प्रभावी नियंत्रण मिळवता येईल. परिणामी, नागरिकांना अधिक स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी सार्वजनिक सुविधा मिळणार आहेत.
दरम्यान, उर्वरित एक संच शासनाच्या ठराविक दरानुसार टप्प्याटप्प्याने पुढील २ ते ३ महिन्यांत महापालिकेला मिळणार आहे. सध्या महापालिकेमार्फत ठेकेदारांच्या माध्यमातून आठ रिसायकल गाड्यांचा वापर सुरू असून, नव्याने प्राप्त झालेल्या वाहनांमुळे ही संख्या वाढून मलनिःसारण व्यवस्थेची क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे.