हास्यजत्रा टीमसोबत सोमवारी दिलखुलास गप्पा

प्रसाद ओक, समीर चौघुले, सई ताम्हणकर यांची उपस्थिती
प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड पुणे दि. २७ एप्रिल २०२५ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या सर्वाधिक लोकप्रिय मालिकेच्या टीमसोबत दिलखुलास गप्पा मारण्याचा कार्यक्रम दिशा सोशल फाऊंडेशनने सोमवारी, (दि. २८ एप्रिल) चिंचवड येथे आयोजित केला आहे. निमित्त आहे, आगामी ‘गुलकंद’ या सिनेमाचे.
‘गुलकंद’ सिनेमा १ मे पासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे. याचे औचित्य साधून अभिनेते प्रसाद ओक, समीर चौघुले, सई ताम्हणकर, ईशा डे, लेखक सचिन मोटे आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी या दिग्गजांशी संवाद साधत खुमासदार किस्से आणि गप्पांचा रंगतदार कार्यक्रम दिशा सोशल फाऊंडेशनने आयोजित केला आहे. प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश असून काही जागा राखीव आहेत. प्रथम येईल, त्यास प्राधान्याने प्रवेश दिला जाणार आहे.



