वैष्णवी, तुझं प्रेम करणं चुकीचं नव्हत..! के. अभिजीत..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २५ मे २०२५ “पोरींनो, प्रेम करू नका. काहीही करण्याआधी आई-वडिलांचा सल्ला घ्या…” हा सल्ला वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या मृत्यूनंतर दिला. पण खरंतर वैष्णवीचं प्रेम करणं तिच्या आयुष्याला संपवणारा गुन्हा नव्हता. तिच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी दिलेला सल्ला ऐकताना काळीज तुटतं, कारण तो सल्ला तिच्या मृत्यूचं खरं कारण झाकतो… म्हणजेच सासरचा छळ, समाजाचं बंधनं घालणं, आणि स्त्रियांच्या स्वातंत्र्याला नाकारणारी मानसिकता.
आपल्या समाजात अजूनही बऱ्याच घरांमध्ये असंच शिकवलं जातं… जसे की प्रेम करू नये, घरच्यांचा सल्ला घ्यावा, मनाप्रमाणे वागू नये. पण असा सल्ला आपल्या मुलींच्या मनावर आणि स्वातंत्र्यावर अन्याय करतो.
प्रेम करणं चूक नसतं. आपला जोडीदार स्वतः आणि योग्य निवडणं… हा प्रत्येक स्त्री-पुरुषाचा अधिकार असतो. जेव्हा एखादी मुलगी प्रेम करते, आणि त्या नात्याला समाजाने किंवा घरच्यांनी मान्यता दिली नाही, तेव्हा तिला अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरं जावं लागतं. विशेषतः लग्नानंतर.
वैष्णवीचं लग्न तिच्या प्रेमात झालं, जुळवून झालं, हट्टाने झालं की घरच्यांच्या दबावाखाली हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं आहे की लग्नानंतर ती सासरी सुरक्षित होती का? तिचा आदर केला जात होता का? की तिला सतत मानसिक त्रास दिला जात होता?
जर एखादी महिला लग्नानंतर इतकी तुटते की तिला आत्महत्या करावी वाटते, तर हा केवळ तिचा वैयक्तिक निर्णय नसतो ही एक सामाजिक हत्या असते.
आपण नेहमी म्हणतो, “लग्न म्हणजे दोन कुटुंबांचं एकत्र येणं.” पण जर त्यात फक्त एका व्यक्तीचा त्याग आणि दुसऱ्यांची मर्जी चालणार असेल, तर तो अन्यायच ठरतो. स्त्रियांना अजूनही आपल्या नात्यांमध्ये आवाज नाही, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही. प्रेम, विवाह, सासर या सगळ्याच ठिकाणी तिच्यावर “सहन कर” असा दबाव असतो.
मुलींनी प्रेम करू नये…हा सल्ला चुकीचा आहे.
हा सल्ला ऐकून मुलींमध्ये भीती निर्माण होते, स्वतःवर विश्वास उरत नाही, आणि आपले निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य गमावलं जातं. सल्ला घेणं वाईट नाही, पण सल्ला जर आदेशात बदलला, तर तो अन्याय होतो. निर्णय घेण्याचा हक्क प्रत्येकाला असतो – मुलगा असो किंवा मुलगी.
प्रेम चुकीचं नव्हतं. चुकीचा होता समाजाचा दृष्टिकोन.
आपण समाज म्हणून बदलायला हवं.
प्रेम करणाऱ्या मुलींचं समर्थन करायला हवं. सासरचा छळ थांबवायला हवं.
स्त्रियां जेव्हा बोलण्याचं धाडस दाखवतात, तेव्हां त्यांच्यामागे खंबीरपणे उभं राहायला हवं.
आम्ही अशा सर्व स्त्रियांच्या सोबत आहोत ज्या छळ, हिंसा किंवा जबरदस्तीनं बनवलेल्या नात्यांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. ज्यांना आपलं स्वातंत्र्य, आत्मसन्मान आणि प्रेमासाठीचा हक्क टिकवायचा आहे. ज्यांना समाजाच्या चुकीच्या नियमांपासून मोकळं व्हायचं आहे.
शेवटी एवढंच…वैष्णवीचं प्रेम चूकीचे नव्हतं, चूक होती ती गुदमरवणारी मानसिकता. आपण तिच्या जाण्याला “शोकांतिका” न बनवता, “शिक्षा” बनवायला हवी… एक शिकवण, जी पुढच्या कुठल्याही वैष्णवीचं आयुष्य वाचवेल.
प्रेमाला अपराधी ठरवू नका त्याला आधार द्या.
असे राईट टू लव्ह अनहद सोशल फाऊंडेशनचे के. अभिजीत यांनी आमच्याशी बोलताना सांगीतले.



