निगडीतील पालिका रुग्णालयात मूलभूत सुविधांचा अभाव !नागरिकांच्या जीवाशी होतोय खेळ तरी पण पालिका खाते भाव..

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. २५ मे २०२५ पिंपरी चिंचवड मधील निगडी स्थित अंकुश चौक, येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत असलेले सरकारी रुग्णालय हे आजही आवश्यक आरोग्य सुविधांपासून वंचित आहे. रुग्णालय रेड झोन हद्दीत येत असल्यामुळे तेथे आवश्यक सेवा, यंत्रसामग्री आणि तांत्रिक सुविधांचा अभाव असून, अनेक रुग्णांना याचा गंभीर फटका बसतो आहे.
सदर रुग्णालयात महिला रुग्णांची डिलिव्हरी (प्रसूती) केली जाते, परंतु एक्स-रे मशिन किंवा तस्सम सामर्गी उपलब्ध नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पिंपरी चिंचवड शहराचे सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुनिल कांबळे यांनी आमच्याशी संपर्क साधून सांगीतले.
यावेळी ते बोलले की या रुग्णालयात आपत्कालीन वैद्यकीय सेवा देखिल उपलब्ध नाहीत, कोणत्याही प्रकारची मोठी शस्त्रक्रिया करता येत नाही.
आपत्कालीन प्रसंगी रुग्णांना यशवंतराव चव्हाण रुग्णालय (YCM), पिंपरी येथे हलवावे लागते, जे रुग्णांकरीता वेळखाऊ आणि जीवघेणे ठरू शकते.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पिंपरी चिंचवड शहर सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुनिल कांबळे यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “या परिसरातील नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. एकीकडे सरकारी रुग्णालय आहे, पण ते केवळ नावालाच आहे. आम्ही केंद्रीय आरोग्य मंत्री यांना विनंती करतो की त्यांनी त्वरित हस्तक्षेप करून या रुग्णालयास संपूर्ण वैद्यकीय सुविधा देण्यासाठी निर्देश द्यावेत.”
पक्षाच्या वतीने केंद्र सरकारकडे आणि संबंधित यंत्रणांकडे लवकरात लवकर निवेदन दिले जाणार आहे. जर वेळेत उपाययोजना झाल्या नाहीत, तर स्थानिक नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या मदतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.



