अभिवादनअमरावतीमहाराष्ट्रविशेषशोध इतिहासाचा..सामाजिक

प्रखर क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या ११९ व्या जयंती निमित्त साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.

शहीद भगतसिंग एक प्रखर क्रांतिकारक

      
प्रतिनिधी अमरावती दि. ३० सप्टेंबर २०२६ प्रखर क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांना दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या ११९ या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ॥
         शहीद भगतसिंग यांचा जन्म दि.२८ सप्टेंबर १९०७ रोजी पंजाबमधील लायलपूर जिल्ह्यातील बंगा गावात (आज हे गाव पाकिस्तानात आहे.) झाला. त्यांच्या वडिलांचे नाव किशनसिंग आणि आईचे नाव विद्यावती होते. त्यांचे कुटुंब देशभक्तांचे होते, ज्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर देशप्रेमाचे संस्कार झाले.
किशनसिंग विद्यावती ।
  देशभक्त माय बाप ॥
होई भगतसिंगांवर ।
  देशप्रेमाचे संस्कार ॥
  वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी त्यांनी *जलियनवाला बाग* हत्याकांडाचे ठिकाण पाहिले, ज्याचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला होता. त्यांनी लाहोरच्या नॅशनल कॉलेजमधून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला झोकून दिले होते.
   नौजवान भारत सभेची स्थापना करून तरुणांना एकत्र आणले. भगतसिंग हे चंद्रशेखर आझाद, राजगुरू आणि सुखदेव यांचे अत्यंत जवळचे मित्र व सहकारी होते. त्यांनी
‘हिंदुस्तान सोशलिस्ट
रिपब्लिकन
असोसिएशन
                या क्रांतिकारी संघटनेत महत्त्वाचे काम केले ‘ सायमन कमिशनच्या विरोधात झालेल्या आंदोलनात लाला लजपत राय यांच्यावर इंग्रजांनी लाठीचार्ज केला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांनी ब्रिटिश अधिकारी सॉंडर्सची गोळ्या झाडून हत्या केली. ब्रिटीश सरकारच्या जुलमी कायद्यांचा विरोध करण्यासाठी त्यांनी दि. ८ एप्रिल १९२९ रोजी दिल्लीच्या सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकला. हा बॉम्ब कोणालाही मारण्यासाठी नव्हता, तर ‘ बहिऱ्या ब्रिटीश सरकारला’ जागे करण्यासाठी होता. बॉम्ब फेकल्यानंतर त्यांनी तिथून पळून न जाता स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांनी न्यायालयात “इन्कलाब जिंदाबाद” अशी घोषणा दिली, जी पुढे देशभर प्रसिद्ध झाली. तुरुंगात असताना त्यांनी भारतीय कैद्यांना ब्रिटीश कैद्यांप्रमाणेच समान हक्क मिळावेत म्हणून ६४ दिवसांचे ऐतिहासिक उपोषण केले.
         भगतसिंग हे केवळ क्रांतिकारक नव्हते, तर ते एक उत्तम लेखक आणि विचारवंतही होते. त्यांनी तुरुंगात असताना
‘मी नास्तिक का आहे?’ हा प्रसिद्ध लेख लिहिला. ते समाजवादी विचारांचे होते आणि त्यांना देशात समता प्रस्थापित करायची होती. ब्रिटीश सरकारने सॉंडर्सच्या हत्येप्रकरणी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावली. देशभरातून त्यांच्या सुटकेसाठी मोठ्या प्रमाणावर मागण्या आणि आंदोलने झाली. जनतेचा वाढता रोष पाहून ब्रिटीश सरकारने ठरलेल्या वेळेच्या ११ तास आधीच त्यांना फाशी देण्याचे ठरवले.
     शहीद भगतसिंग यांना दि. २३ मार्च १९३१ रोजी संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी लाहोर मध्यवर्ती कारागृहात ब्रिटिश शासनाद्वारे फाशी देण्यात आली. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी शिवराम हरी राजगुरू आणि सुखदेव थापर यांनाही याच दिवशी फाशी देण्यात आली.
          फाशीच्या खांबाकडे जातानाही त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, उलट ते हसत-हसत गीत गात पुढे गेले.
      भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी दि.२३ मार्च १९३१ रोजी लाहोर मध्यवर्ती तुरुंगात फाशीच्या तख्त्याकडे जाताना त्यांचे आवडते देशभक्तीपर गीत गात जात  होते .
“दिल से निकलेगी न मरकर भी वतन की उल्फ़त,
मेरी मिट्टी से भी ख़ुशबू-ए-वफ़ा आएगी।”
(हा सुप्रसिद्ध शेर महान कवी लालचंद फलक यांनी लिहिला होता.)
         तसेच तुरुंगात असताना आणि फाशीला सामोरे जाताना
“मेरा रंग दे बसंती चोला” आणि “सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है”
ही गीते देखील मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने गात होते. फाशीच्या खांबावर जातानाही त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, उलट ते भारत मातेच्या जयघोषात आणि ‘ इन्कलाब जिंदाबाद’ च्या घोषणा देत आनंदाने हुतात्मा झाले.
        शहीद भगतसिंग यांनी वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी  देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या या सर्वोच्च बलिदानामुळे त्यांना ‘शहीद-ए-आजम’ ही पदवी देण्यात आली. त्यांचा मृत्यू देशातील लाखो तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत बनला आणि स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र झाला. दरवर्षी २३ मार्च हा दिवस भारतात ‘शहीद दिन‘ म्हणून साजरा केला जातो.
         भगतसिंग यांचे नाव भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे. त्यांचे विचार आणि देशभक्ती आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात जिवंत आहे. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. आज प्रत्येक भारतीयांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायासाठी लढले पाहिजे. स्वतःचे कार्य प्रामाणिकपणे करून भारत..
बलवान केला पाहिजे,
बलशाली केला पाहिजे,
भ्रष्टाचार मुक्त केला पाहिजे,
अत्याचार मुक्त केला पाहिजे,
अन्याय मुक्त केला पाहिजे

तेव्हाच शहीद भगतसिंगांची जयंती साजरी केल्याचे सार्थक होईल.
   भगतसिंगांचा ।
   आज जन्मदिन ॥
    दोन्ही करांनी वंदन ।
     कोटी कोटी प्रणाम ॥

   राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिक व अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले, अमरावती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button