चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता व कायद्याचे समान पालन व्हावे – रहिवाशांचे पालिका आयुक्तांना निवेदन..

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड, दि. १० जून २०२६ चिखली, कुदळवाडी परिसरातील रहिवाशांनी दि. ०८ जून रोजी PCMC आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना अतिरिक्त आयुक्त अतिक्रमण विभाग तृप्ती सांडभोर यांच्या मार्फत निवेदन देऊन अतिक्रमण विरोधी कारवाईबाबत आपली भूमिका मांडली.
निवेदनातील मुख्य मुद्दे:
१. समान कारवाईची मागणी: अर्जदार श्री. अर्शद अस्लम खान व इतर रहिवाशांनी म्हटले आहे की, महापालिकेने दुजाभाव न करता अनधिकृत बांधकामांविरुद्ध सरसकट कारवाई करावी. पारदर्शक कारवाई अपेक्षित आहे. कारवाई करताना कायद्याला अनुसरून जिथे अनधिकृत बांधकामे आहेत ती जमिनदोस्त करावीत. केवळ विशिष्ट समाजाला टार्गेट करू नये.
२. नियमितीकरणाची मागणी: शहरातील इतर अनधिकृत बांधकामे जशी दंड आकारून नियमित केली गेली, तशीच संधी चिखली-कुदळवाडीतील रहिवाशांनाही द्यावी, अशी विनंती आहे. अनेक वर्षांपासून राहणाऱ्या कुटुंबांना पाणी, मलनिस्सारण यासारख्या मूलभूत सुविधा अजूनही मिळालेल्या नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
३. १० एप्रिल २०२६ च्या कारवाईबाबत: निवेदनात उल्लेख आहे की दि. १० एप्रिल २०२६ रोजी झालेल्या कारवाईत प्रार्थनास्थळासह दुकाने, लहान उद्योग, राहती घरे जमिनदोस्त करण्यात आली. यामुळे रहिवाशांमध्ये असुरक्षितता व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
४. अतिरिक्त कारवाई स्थगित करण्याची विनंती: मुस्लिम समाजबांधव अनधिकृत बांधकामे नियमितीकरण करण्यास तयार आहेत. त्यांना संधी देऊन नियोजित अतिरिक्त कारवाई स्थगित करावी, अशी मागणी अर्जदारांनी केली आहे.
यावेळी श्री. अर्शद अस्लम खान , श्री. अब्दुल करिम,अस्लम खान व चिखली, कुदळवाडी परिसरातील रहिवाशी उपस्थीत होते.



