
प्रतिनिधी येरावडा पूणे दि. ०६ ऑक्टोबर २०२५ साधारण पाच दिवसांन पूर्वी दिनांक ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी बार्टी, येरवडा येथील ग्रंथ दालनाच्या बाजूस महापुरुषांचे ग्रंथ, त्यांचे फोटो व भारतीय संविधानाच्या प्रती कुजलेल्या व आळ्या पडलेल्या अवस्थेत आढळून आले, हा प्रकार समाजाच्या विचारप्रणालीचा, महान व्यक्तींच्या स्मृतींचा व भारतीय संविधानाचा उघड अपमान करणारा आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर असे स्पष्ट झाले आहे की, या विभागाच्या तात्कालीन विभाग प्रमुख श्रीमती इंदिरा आस्वार, ज्यांच्याकडे त्या काळात अतिरिक्त विभाग प्रमुखपदाचा चार्ज होता (त्या स्वतः बार्टीच्या निबंधक आहेत), तसेच प्रकाशन व प्रसिद्धी विभागाच्या प्रकल्प व्यवस्थापक (बाह्यस्रोत कर्मचारी) श्रीमती नसरीन तांबोळी यांनी संबंधित बाबींकडे अत्यंत दुर्लक्ष केले.
दिनांक ०१ एप्रिल २०२५ रोजी, या विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेषतः श्रीमती सुनंदा गायकवाड यांनी विभाग प्रमुखांना लेखी पत्र तसेच व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे स्पष्टपणे सूचना दिल्या होत्या की, “पावसाळ्याच्या अगोदर पुस्तके, ग्रंथ व संविधान प्रती सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, अन्यथा गंभीर नुकसान होईल.”
तथापि, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या सूचनांकडे पूर्ण दुर्लक्ष केले आणि योग्य ती व्यवस्था न केल्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडली.
हे स्पष्टपणे प्रशासनातील निष्काळजीपणा, दुर्लक्ष आणि जबाबदारी टाळण्याचे उदाहरण आहे. म्हणून आम्ही, खालील सर्व संघटनांच्या वतीने, मागणी करतो की
श्रीमती इंदिरा आस्वार (निबंधक, बार्टी आणि तत्कालीन विभाग प्रमुख) यांच्यावर निलंबनाची व श्रीमती नसरीन तांबोळी (प्रकल्प व्यवस्थापक, प्रकाशन व प्रसिद्धी विभाग, बाह्यस्रोत कर्मचारी) यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात यावी.
या घटनेतील सर्व संबंधित नियमित अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी व कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.
महापुरुषांचा, त्यांच्या विचारांचा आणि भारतीय संविधानाचा अपमान आम्ही कदापिही सहन करणार नाही. या संदर्भात तात्काळ कारवाई करावी असे निवेदन आज विश्वत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समितीच्या वतीने समाजकल्याण आयुक्त यांना देण्यात आले हे निवेदन गणेश मरकड सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी स्वीकारले यावेळी समितीचे निमंत्रण बाळासाहेब रोकडे, संतोष जोगदंड, दत्ताभाऊ गायकवाड, दीपक भालेराव, अजय शेरखाने उपस्थित होते.



