निवडणूक कामकाजामुळे महापालिका क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी होणारी जनसंवाद सभा रद्द..

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. २३ नोव्हेंबर २०२५ महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार याद्यांवरील हरकती सूचना आणि तक्रारी स्विकारण्याचे कामकाज सुरू असल्याने येत्या सोमवारी (दि. २४ नोव्हेंबर) होणारी जनसंवाद सभा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.
महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांची मतदार यादी प्रभागनिहाय विभाजित करून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवर नागरिकांना हरकती व सूचना दाखल करण्यासाठी २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. या काळात नागरिकांकडून प्रारूप मतदार यादीवर येणाऱ्या हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच पिंपरी येथील सावित्रीबाई फुले सभागृह येथे मुख्यालय स्तरावर कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कामकाजासाठी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह इतरही अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आली आहे. हे कामकाज महत्वाचे आणि कालमर्यादीत असल्याने सोमवारी २४ नोव्हेंबर रोजी होणारी जनसंवाद सभा रद्द करण्यात आली आहे.
नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय कार्यालयीन कामकाजाचा दिवस असलेल्या प्रत्येक महिन्याच्या दुस-या व चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन केले जाते.



