
साहसी खेळांबरोबरच घोडेस्वारी,स्कूबा डायव्हिंग, मिलिटरी बॅन्ड ठरणार आकर्षण
प्रतिनिधी रेणूका गायकवाड नाशिक दि. २९ नोव्हेंबर २०२५ युवकांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे आज (ता. २९) पासून सीएचएमई भोसला अँडव्हेंचर स्पोर्टस् फेस्टिव्हल २०२५ घेण्यात येणार आहे. भारतात पहिल्यांदाच अशाप्रकारे अँडव्हेंचर स्पोर्टस् फेस्टिव्हल घेण्यात येत असून स्पर्धकांचा चांगला सहभाग लाभला आहे. यानमित्ताने भारतीय युध्द कला, साहसी खेळांविषयक लघुपट आणि मिलिटरी बॅन्डचे प्रात्याक्षिक हे महोत्सवाचे वेगळेपण म्हणता येईल.
सात तारखेपर्यत चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन आज (ता.२९) सकाळी आठला भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याहस्ते होईल. मुख्य वनसंरक्षक जी.मल्लीकार्जुन हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. याशिवाय संस्थेचे अध्यक्ष लेप्टनंट जनरल (निवृत्त) डॉ.डी.बी.शेकटकर, कार्याध्यक्ष अँड.अविनाश भिडे, उपाध्यक्ष शैलेश जोगळेकर, एअर मार्शल(निवृत्त) डॉ.अजित भोसले, सरकार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे, नाशिक विभागाचे अध्यक्ष इंजि.संजय पगारे, कार्यवाह मिलिंद वैद्य आदी उपस्थित राहतील.
सैनिकी क्षेत्रात देशात अग्रेसर असलेल्या सीएचएमई भोसला नेहमीच आपल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांसाठी प्रसिध्द आहे. व्यक्तीमत्व विकासासाठी सैनिकी शिक्षणांच्या जोडीलाच साहसी आणि क्रीडा प्रकारांची जोड मिळाल्यास व्यक्तीमत्व अधिक फुलविण्यास मदत होते, साहसी खेळाचा प्रचार प्रसार व्हावा, हेच लक्षात घेऊन सीएचएमई संस्थने यंदा भोसला अँडव्हेंचर स्पोर्टस् फेस्टिव्हल घेण्यास प्राधान्य दिले आहे. भारतात अशाप्रकाराचा महोत्सव भरविणारी सीएचएमई बहुधा एकमेव संस्था असावी. या महोत्सवात 18 ते 65 वर्षातील युवक, प्रौढ सहभागी होऊ शकतात. त्यासाठी वैयक्तीक आणि सांघिक अशी वर्गवारी करण्यात आली असून फेस्टिव्हलमधील स्पर्धा सर्वांसाठी खुली असेल.
साहसी क्रीडाप्रकारांना विशेष प्राधान्य
महोत्सवाचे साहसी क्रीडाप्रकार हे विशेष आकर्षण असेल. नाशिक आणि परिसराला लाभलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा, त्र्यंबकेश्वर भागातील धरणे, डोंगरदऱ्या, आडवळणाचे घाटक्षेत्र आणि पठारावरील भाग याठिकाणी साहसी क्रीडाप्रकारांची स्पर्धा व प्रात्याक्षिक होतील. सांघिक क्रीडाप्रकारांमध्ये माऊंटन सायकलिंग, रेज ट्रेक, नेव्हिगेशन, राफटींग, ट्राय-व्हेंटर (सायकलिंग,रेज ट्रेक आणि राफटींग यांचा समावेश) हे क्रीडाप्रकार असतील. त्यासाठी १८ ते ३५ आणि ३६ ते ६५ असे वयोगट निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक सांघिक गटात साधारणपणे चार सदस्यांची स्वतंत्र टिम असेल. पुरुष आणि महिला यांच्या स्वतंत्र टिम या सांघिक स्पर्धेत सहभागी होतील.
पहिल्यांदाच बोल्डरिंग, सेलिंग, स्कुबा डायविंग करण्याची संधी.
या महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सकाळ व दुपार सत्रात या स्पर्धा होतील, महोत्सवाचा स्पर्धा हा उद्देश नसून जनजागृती करणे हे प्रमुख ध्येय आहे. वैयक्तीक क्रीडाप्रकारातील बोल्डरिंग(१८ ते ३५ आणि १७ ते ६५) स्पर्धेत या गटातील स्पर्धेक सहभागी होऊ शकतील तर रोप आणि अडथळ्याची(ऑबस्ट्रकल) शर्यतीसाठी १२ ते १७ आणि १८ ते ३५ असा वयोगट असेल, या गटामध्ये आपल्याला सर्वाधिक चुरस पहायला मिळणार आहे. वैयक्तीक क्रीडा प्रकारांतील नेमबाजी( रायफल शुटींग)(१५ ते १७ वयोगट आणि १८ च्या पुढे),पॅरासेलिंग(१८ ते ३५ वयोगट), सेलिंग(१५ ते १७आणि १८ पुढील वयोगट),स्कूबा डायव्हिंग(१५ ते १७ आणि १८ पुढील वयोगट) या खेळांमध्ये चांगली कामगिरी नोंदविण्यासाठी स्पर्धेकांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, नियमित सराव आणि मेहनतीच्या जोरावर या क्रीडाप्रकारात स्पर्धेक आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवू शकतात. प्रत्येक गटातील विजेते, उपविजेत्यांना खास पारितोषिके देण्यात येणार आहे. स्कूबा डायव्हिंग हे भोसला जलतरण तलावात होईल त्यासाठी मुंबईतील स्कूबा असोसिएशनच्या तज्ञांची मदत घेतली जात आहे. तर नौकानयन(सेलिंग) स्पर्धा गंगापूर धरणक्षेत्रात होईल, त्यासाठी अलिबाग येथून खास बोटी आणण्यात आल्या आहेत.
भारतीय युध्दकला, घोडेस्वारी,मिलीटरी बॅन्डचे प्रात्याक्षिक
या संपूर्ण महोत्सवाचे आणखी एक आकर्षण म्हणजे भोसला कॅम्पस् च्या प्रांगणात नेमबाजीसह घोडेस्वारी पाहण्याचा आनंद नाशिककरांना घेता येईल याशिवाय भारतीय युद्ध कलेत वापरण्यात येणाऱ्या साधनांचे प्रात्याक्षिक आणि सध्या देशभर गाजत असलेल्या विविध मिलिटरी बँडचे संचलन, प्रात्याक्षिक हे सुध्दा अगदी जवळून नाशिककरांना पाहता येणार आहे.
संवाद साधण्याची आणि फिल्म पाहण्याची संधी
या महोत्सवाच्या निमित्ताने स्कूबा, सेलिंग आणि माऊंटनरिंग प्रकारातील विविध वैशिष्टयांवर नावाजलेले खेळाडू, प्रशिक्षक,संघटक यांच्याशी संवाद साधण्याची तसेच काही लघुपट,चित्रपट पाहण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. हा महोत्सव केवळ सीएचएमई संस्थेचा नसून नाशिककरांचा महोत्सव आहे. नाशिककरांनी जरूर उपस्थित रहावे,महोत्सवात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
चौकट
महोत्सव वेळापत्रक( तारीख,प्रकार आणि ठिकाण या क्रमाने)
सांघिक खेळ( टिम कॉम्पेटेटिव्ह स्पोर्टस्)-(चार जणांची एक टिम,पुरूष व महिला स्वतंत्र टिम)
३० नोव्हेंबर- रेंज ट्रेक-अंजनेरी
५डिसेंबर-नेव्हिगेशन-अंजनेरी
६ डिसेंबर-राफ्टींग-तळेगाव कार्चुर्ली
७ डिसेंबर-ट्राई व्हेंचर(रेंज ट्रेक,राफ्टिंग,सायक्लिंग)
वैयक्तीक क्रीडाप्रकार
२९ नोव्हेंबर-माऊंटन सायक्लिंग-त्र्यंबकेश्वर,अंजनेरी
४ डिसेंबर-बाऊलडरिंग- अंजनेरी
३० नोव्हेंबर आणि ६ डिसेंबर-रोप अँन्ड अँब्स्ट्रकल-भोसला मिलिटरी स्कूल
स्पर्धा नसलेले क्रीडाप्रकार(वैयक्तीक)
२९ नोव्हेंबर- नेमबाजी- भोसला स्कूल
१ डिसेंबर-पॅरासेलिंग-अंजनेरी
२ आणि ३डिसेंबर-नौकानयन-गंगापूर धरण
३ आणि ४ डिसेंबर-स्कूबा डायव्हिंग- भोसला जलतरण तलाव
प्रात्याक्षिके(सर्वांसाठी खुला)
-घोडेस्वारी, भारतीय युध्दकला,मिलीटरी बॅन्ड,भोसला जिम्नॅस्टीक्स्
मुक्त संवाद आणि फिल्म शो
-स्कूबा,सेलिंग आणि माऊंटनरिंग टॉक शो
-अँडेव्हेंचर फिल्म शो



