
प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. 24 जानेवारी 2026 ‘मी कोणाला घाबरत नाही’, गुटखा खात दादागिरी करणारा इंदापूरचा ‘तो’ अधिकारी अखेर निलंबित.
इंदापूर: “मी कोणालाही घाबरत नाही, मी खानदानी पैसेवाला आहे,” अशी दर्पोक्ती करत कार्यालयातच गुटखा खाऊन नागरिकांशी उर्मट वर्तन करणाऱ्या इंदापूर भूमी अभिलेख कार्यालयातील त्या अधिकाऱ्याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. विवेकानंद कुलकर्णी (मुख्यालय सहाय्यक, रा. पळसदेव, ता. इंदापूर) असे निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २०) दुपारी इंदापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात हा प्रकार घडला. संतोष महादेव रकटे (रा. शेटफळगढे, ता. इंदापूर) यांनी आपल्या जमिनीच्या एका जुन्या प्रकरणाची (गट नंबर २५२ मो.र.नं. ५८१७/२०२१) नक्कल मिळण्यासाठी कार्यालयाकडे तीन वेळा अर्ज केला होता. मात्र, त्यांना कागदपत्रे मिळत नसल्याने त्यांनी थेट तालुका उपअधीक्षकांकडे तक्रार केली. उपअधीक्षकांनी कुलकर्णी यांना तातडीने कागदपत्रे देण्याचे आदेश दिले.
वरिष्ठांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून कुलकर्णी यांनी रकटे यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे शासकीय कार्यालयात उघडपणे गुटखा खात त्यांनी “मी पळसदेवचाच आहे. खानदानी पैसेवाला आहे. माझा साडेसतरा एकर ऊस, केळी आहे. दहा-वीस लाख टाकून मोकळा होतो. मी केवळ गंमत म्हणून नोकरी करतो. तुम्ही साहेबाला पाठवले काय किंवा कोठेही तक्रार केली तरी मी घाबरणार नाही,” अशी बेताल बडबड केली.
या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. शासकीय कार्यालयात गुटखा खाऊन नागरिकांना अशी वागणूक दिल्याने भूमी अभिलेख खात्याची प्रतिमा मलीन झाली होती. तक्रारदाराने पोलिसांना बोलावल्याची कुणकुण लागताच कुलकर्णी यांनी कार्यालयातून पळ काढला होता. अखेर या गंभीर प्रकाराची दखल घेत वरिष्ठ कार्यालयाने विवेकानंद कुलकर्णी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.



