महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक वळण; सुनेत्रा पवार होणार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री! आजच पार पडणार शपथविधी..

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. ३१ जानेवारी २०२६ महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या आणि ऐतिहासिक निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री या पदासाठी त्यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची निवड निश्चित झाली असून. आज शनिवार ३१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी राजभवन येथे हा विशेष शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
पक्षांतर्गत एकमत आणि आमदारांचा पाठिंबा
अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे पक्षात आणि सरकारमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी काल मुंबईत महत्त्वाची बैठक घेतली. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यासह पक्षाच्या बहुतांश आमदारांनी श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. “सुनेत्रा वहिनींना ही जबाबदारी देणे हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल आणि या निर्णयामुळे पक्ष एकसंघ देखील राहील,” अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
ऐतिहासिक क्षण:
राज्याला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यास, त्या महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील. सध्या त्या राज्यसभा खासदार म्हणून कार्यरत असून, त्यांना प्रशासकीय आणि राजकीय वारसा लाभलेला आहे. त्यांचे वडील पद्मसिंह पाटील हे देखील राज्याच्या मंत्रिमंडळात ज्येष्ठ मंत्री होते. त्यांच्या निवडीमुळे महिला नेतृत्वाला राज्यात मोठे व्यासपीठ मिळणार असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा हा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.
महायुतीचा समन्वय आणि पुढील दिशा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या निर्णयाबाबत चर्चा केली. महायुतीमधील घटक पक्षांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून, सरकारचे कामकाज विनाव्यत्यय सुरू ठेवण्यासाठी ही तातडीची नियुक्ती महत्त्वाची असल्याचे सांगितले जात आहे. आज दुपारी विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल आणि त्यानंतर सायंकाळी राज्यपालांच्या उपस्थितीत त्यांचा शपथविधी संपन्न होईल.



