
प्रतिनिधी सतीश पाटील मुंबई दि. 19 फेब्रुवारी 2026 रुग्णांच्या जीवाशी खेळ; बिहार कनेक्शन उघड..
उच्च रक्तदाबावर अत्यंत गुणकारी मानल्या जाणाऱ्या ‘Telma AM’ या औषधाच्या बनावट गोळ्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा डोंबिवलीच्या मनपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी डोंबिवली आणि मुंबईतील दोन मोठ्या औषध वितरकांना अटक केली असून त्यांच्याकडून बनावट औषधांचा मोठा साठा जप्त केला आहे. प्रसिद्ध कंपनीच्या औषधाच्या नावे चक्क बनावट गोळ्या विकून रुग्णांच्या जिवाशी खेळ खेळला जात असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
‘श्री राम फार्मा’सह मुंबईतील वितरकाला बेड्या”
मिळालेल्या माहितीनुसार, मानपाडा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई केली आहे. डोंबिवलीतील ‘श्री राम फार्मा’चा मालक पंकज उपाध्याये आणि मुंबईतील वितरक विवेक राय या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून नामांकित कंपनीचे हुबेहूब लेबल आणि पॅकिंग असलेल्या बनावट गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
FDA चा धक्कादायक खुलासा, हृदयविकाराचा धोका!
अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या बनावट औषधांची तपासणी केल्यानंतर एक खळबळजनक बाब समोर आली आहे. या बनावट गोळ्या शरीरात गेल्यानंतर वेळेवर विरघळत नाहीत. त्या विरघळण्यास अत्यंत उशीर लागतो. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी रुग्णाला तातडीने औषधाची गरज असते. मात्र, हे औषध वेळेवर परिणाम करत नसल्याने रुग्णाला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) किंवा ब्रेन स्ट्रोक (Stroke) येण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
तपासात ‘बिहार’ कनेक्शन उघड
मानपाडा पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात या रॅकेटचे धागेदोरे बिहार राज्यापर्यंत पोहोचले असल्याचे समोर आले आहे. ही बनावट औषधे नेमकी कुठे तयार होतात आणि महाराष्ट्रात ती इतर किती शहरांमध्ये पोहोचली आहेत, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या रॅकेटमध्ये अजून काही बड्या वितरकांचा हात असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.



