अभिनंदनउत्सवनाशिकमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

महिला दिनानिमित्त महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा नाशिक मध्ये विशेष सत्कार करण्यात आला.

प्रतिनिधी रेणुका गायकवाड नाशिक दि. १० मार्च २०२६ आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य महिला आयोग अंतर्गत कार्यरत महिला मदत व समुपदेशन केंद्र, नाशिक रोड यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
नाशिक रोड पोलीस स्टेशन आणि उपनगर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच महिला होमगार्ड कर्मचाऱ्यांचा यावेळी विशेष भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला पोलीस अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाला महिला मदत व समुपदेशन केंद्र, नाशिक रोडचे केंद्रप्रमुख श्री. सुरवाडकर, सौ. रंजना चकोर, कायदेशीर सल्लागार सोनल पाटील, प्रसिद्धीप्रमुख रेणुका गायकवाड, केंद्र संचालक गायत्री साबळे, तसेच डॉ. गंगा पंडित, प्राजक्ता तुपे आणि छाया सोनवणे उपस्थित होत्या.
यावेळी मान्यवरांनी महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. महिला पोलीस अधिकारी समाजात महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सातत्याने कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला दिन हा महिलांच्या कर्तृत्वाचा आणि समाजातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा दिवस असून, अशा उपक्रमांमुळे महिलांच्या कार्याला प्रोत्साहन मिळते आणि समाजात महिलांप्रती आदराची भावना अधिक दृढ होते, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
नाशिक रोड पोलीस स्टेशन आणि उपनगर पोलीस स्टेशन येथे झालेला हा सत्कार सोहळा महिलांच्या कार्याचा गौरव करणारा आणि प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमात उपस्थित महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!