आंदोलनमहाराष्ट्रमूंबईविशेषसामाजिक

पालघर विकास प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या शेतकरी व ग्रामस्थांवरील अन्यायाविरोधात आगरी सेनेचा सरकारला इशारा– कैलास पाटील 

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. २१ एप्रिल २०२६ भूमीपुत्रांना कळकळीचे आवाहन पालघर जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या शेतकरी व ग्रामस्थांवरील अन्यायाविरोधात आगरी सेनेने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आगरी सेना प्रमुख मा. राजाराम साळवी यांनी केळवे येथे महत्त्वपूर्ण बैठक बोलावून पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली.
या बैठकीस कार्याध्यक्ष चंदुलाल घरत, सरचिटणीस मेघनाथ पाटील, कामगार नेते प्रदीप साळवी तसेच महाराष्ट्र कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी साहित्यिक संजय पाटील मायखोपकर यांनी जिल्हाध्यक्ष चेतन गावंड यांच्याशी संवाद साधून प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्या समोर आणल्या. बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे वाढलेल्या समस्या
विठ्ठलवाडी, मांडे, शिल्टे, विराथन, जलसार आणि टेंभीखोडावे या ग्रामपंचायत हद्दीतून प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्ग जात असून, प्रकल्प सुरू झाल्यापासून स्थानिकांना अनेक गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. या भागात आगरी, कोळी, आदिवासी आणि बौद्ध समाजाची मोठी वस्ती आहे.
प्रमुख तक्रारी व मागण्या
पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न: करवाळे धरणातून अपुरा पाणीपुरवठा होत असून प्रस्तावित बंधाऱ्याची योजना बुलेट ट्रेन मार्गामुळे रद्द झाल्याने भविष्यातील पाणीपुरवठा धोक्यात. पर्यायी योजना तातडीने राबवावी.
धोकादायक वाहतूक सुरूच:
टेंभीखोडावे येथील पूल धोकादायक असल्याचा इशारा असूनही एल अँड टीकडून अवजड वाहतूक सुरूच; नागरिकांच्या जीवितास धोका.
जुन्या पाण्याच्या टाकीला धोका:
पिलर कामामुळे टाकीला भेगा पडल्या; संभाव्य दुर्घटनेची भीती व्यक्त.
प्रदूषणाचा वाढता प्रश्न:
जलसार येथे उभारलेले RMC प्लांट व क्रशर परवानगीशिवाय सुरू; धुळीमुळे शेती व आरोग्यावर परिणाम.
बंधाऱ्याचे नुकसान:
दारशेत परिसरातील पाटबंधारे विभागाने बांधलेला बंधारा परवानगीशिवाय तोडल्याचा आरोप; पुनर्बांधणीची मागणी.
अपुरा मोबदला:
ग्रीन झोन असूनही रेडी रेकनर दराने कमी मोबदला; अनेक शेतकरी अजूनही नुकसानभरपाईपासून वंचित.
भ्रष्टाचाराचा आरोप:
सुमारे १२०० कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी अपूर्ण; पारदर्शकतेची मागणी.
स्फोटांमुळे घरांचे नुकसान:
भुयारी मार्गासाठी झालेल्या स्फोटांमुळे घरांना भेगा; नुकसानभरपाई अद्याप नाही.
बोअरवेल व पाणी स्रोत बाधित: स्फोटांमुळे बोअर निकामी; पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी.
जमिनींचा अतिक्रमण व भाडे प्रकरण:
संपादित जमिनींची सीमा निश्चित न करता वापर; भाडे न देता शेतकऱ्यांचे नुकसान.
प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी
वरील सर्व तक्रारी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडे मांडूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि एल अँड टी अधिकाऱ्यांची कथित मनमानी याविरोधात आता तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
रास्ता रोकोचा इशारा
“शेतकरी व ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी आता रास्ता रोको आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही,” असा इशारा आगरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी दिला. त्यांनी सर्व भूमिपुत्रांना एकत्र येऊन या आंदोलनात सहभागी होण्याचे कळकळीचे आवाहन केले. स्थानिक पातळीवर वाढत चाललेला असंतोष लक्षात घेता प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!