आंदोलनउत्सवदेश-विदेशपिंपरी-चिंचवडपूणेमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

पुण्यात आज घुमणार विद्यार्थिनींचा आवाज; राहुल गांधींचा ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड पुणे दि. २२ ऑगस्ट २०२६ देशातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘छात्रों की गूंज’ अभियानांतर्गत काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी (२२ ऑगस्ट) पुण्यात विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. जुन्या आरटीओजवळील AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मैदानावर हा विशेष संवाद कार्यक्रम होणार असून, विद्यार्थिनींच्या शिक्षण, सुरक्षितता, रोजगार, परीक्षा पद्धती तसेच त्यांच्या भविष्यासंदर्भातील प्रश्नांवर राहुल गांधी त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहेत.

‘छात्रों की गूंज’ अभियानाची सुरुवात राजस्थानातील कोटा येथून झाली. त्यानंतर देहरादून आणि नुकताच प्रयागराज येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. कोटा येथे सुरू झालेल्या या अभियानाच्या माध्यमातून पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील अनियमितता, महागडे शिक्षण, बेरोजगारी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न मांडले जात आहेत. देहरादूननंतर प्रयागराज येथील कार्यक्रमातही विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षण, रोजगार आणि स्पर्धा परीक्षांशी संबंधित अडचणी मांडल्या.

पुण्यातील कार्यक्रमाचे विशेष महत्त्व आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे मुलींच्या शिक्षणाच्या इतिहासात पुण्याला विशेष स्थान आहे. त्याच पुण्यात आजच्या विद्यार्थिनींच्या प्रश्नांवर थेट संवाद साधण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आल्याने या कार्यक्रमाला ऐतिहासिक संदर्भ लाभला आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव ॲड. उमेश खंदारे म्हणाले, “पुणे ही केवळ विद्येची माहेरघर म्हणून ओळखली जाणारी नगरी नाही, तर सावित्रीबाई फुले यांनी याच भूमीत मुलींच्या शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू करून देशाच्या सामाजिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे ‘छात्रों की गूंज’चा पुण्यातील कार्यक्रम हा केवळ राजकीय कार्यक्रम न राहता आजच्या विद्यार्थिनींच्या अपेक्षा, अडचणी आणि स्वप्नांना व्यासपीठ देणारा संवाद ठरला पाहिजे.”

“आजच्या विद्यार्थिनींना शिक्षणाबरोबरच सुरक्षित वातावरण, समान संधी, गुणवत्तापूर्ण रोजगार आणि स्वतःचा आवाज मांडण्याची मोकळीक हवी आहे. राहुल गांधी यांनी कोटा, देहरादून आणि प्रयागराज येथे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. आता पुण्यात ते विशेषतः विद्यार्थिनींचे म्हणणे ऐकणार आहेत. सावित्रीबाईंच्या पुण्यातून देशातील मुलींच्या प्रश्नांचा आवाज बुलंद होणे ही अभिमानाची बाब आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने या संवादात सहभागी होऊन आपल्या प्रश्नांवर मोकळेपणाने व्यक्त व्हावे,” असे आवाहन ॲड. खंदारे यांनी केले.

पुण्यातील कार्यक्रमासाठी तयारीचा आढावा काँग्रेस पदाधिकारी आणि पोलिस प्रशासनाकडून घेण्यात आला असून कार्यक्रमस्थळी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button