देश-विदेशमहाराष्ट्रमूंबईराजकीयविशेषशहरसामाजिक

दि. बा. पाटील विमानतळ नामांतर हे कोर्टाच्या आधिपत्यात मोडत नाही सर्वोच्च न्यायालयाने मत व्यक्त केले..

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. २० मे २०२६ दि. बा. पाटील विमानतळ नामांतर केंद्र व राज्य सरकार ठरवणार असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून सुरू असलेल्या वादाला आता एक मोठे कायदेशीर वळण मिळाले आहे. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने (सुप्रीम कोर्ट) आज थेट फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे याचिकाकर्त्यांना मोठा कायदेशीर धक्का बसला असून, नामकरणाचा चेंडू आता पुन्हा एकदा सरकारच्या कोर्टात गेला आहे.
भूमिपुत्रांना मोठा धक्का! नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याबाबत सुप्रीम कोर्टाचा अत्यंत मोठा निर्णय
‘तो अधिकार कोर्टाचा नाही’ – सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट मत
याचिकेवर सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. “कुठल्याही वास्तूला किंवा ठिकाणाला नाव देण्याचा अधिकार न्यायालयाचा नाही,” असे कोर्टाने स्पष्ट शब्दात सुनावले. न्यायमूर्तींनी पुढे स्पष्ट केले की, “हा विषय पूर्णपणे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे कोर्ट या प्रशासकीय प्रक्रियेत आणि धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करू शकत नाही.”
सरकारकडे जाण्याच्या कोर्टाच्या सूचना
याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना योग्य व्यासपीठावर जाण्याचा सल्ला दिला आहे. “तुम्ही या मागणीसाठी संबंधित राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे जाऊन विचारणा करा,” अशी सूचना कोर्टाने दिली.
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी स्थानिक भूमिपुत्र आणि विविध संघटनांनी गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात मोठी आंदोलने केली होती. राज्य सरकारनेही यापूर्वी या नावाचा प्रस्ताव मंजूर केला होता. नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतरही त्यांचे नाव अद्यापही देण्यात आले नाही. त्यावरून स्थानिकांमध्ये असंतोष आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेनंतर या नावाचा अंतिम निर्णय केंद्र आणि राज्य सरकारच्या मंजुरीवरच अवलंबून असणार आहे. त्यामुळे आता सरकार यावर काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दि.बा. पाटील कोण होते?
लोकनेते दिनकर बाळू पाटील (दि. बा. पाटील) हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रभावशाली शेतकरी नेते आणि रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्रांचे बुलंद आवाज होते。शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) ज्येष्ठ नेते असलेल्या दि. बा. पाटील यांनी नवी मुंबईच्या उभारणीसाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी (१२.५% परतावा योजना) मोठे आंदोलन उभारले होते. सिडको (सिटी इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट काॅर्पोरेशन) ही सरकारी संस्था त्यावेळी नवी मुंबईची बांधणी करत होती. त्या काळात पाटलांनी नवी मुंबई सिडको आणि जेएनपीटी (न्हावा शेवा बंदर) प्रकल्पग्रस्त जनतेचे खंबीर नेतृत्व केले.
दि.बा. पाटील हे पनवेल पालिकेचे नगराध्यक्ष होते. त्याशिवाय महाराष्ट्राचे पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे ५ वेळा आमदार, एकदा महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे २ वेळा खासदार म्हणूनही त्यांनी प्रतिनिधीत्व केले.
भूमिपुत्रांच्या हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या लोकनेत्याचे स्मरण म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. आता सरकार काय निर्णय घेते या कडे सर्व भूमिपुत्रांचे  लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!