मुलुंड येथील ५८ एकर मिठागरांची जागा धारावी पुनर्वसनासाठी वापरली जाणार!

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. २९ मे २०२६ आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीपैकी एक असलेल्या धारावीचा पूनर्विकास केला जाणार आहे. धारावी पूनर्विकास प्रकल्पांतर्गत येथील अपात्र रहिवाशांचे धारावी बाहेर पूनर्वसन केले जाणार आहे. ठाण्याच्या वेशीवर असलेल्या मुलुंड भागात हे पूनर्वसन होणार असल्याने येथील नागरिकांनी त्यास ठाम विरोध दर्शविला होता. आता येथील मिठागरे वाचवा समितीने देखील जनआंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
धारावी पूनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून धारावीचा पूनर्विकास केला जाणार आहे. यामध्ये काही अपात्र रहिवाशांचे ठाणे शहराच्या वेशीवरील मुंबईतील मुलुंड येथे पूनर्वसन करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार, तेथील रहिवाशांना धारावी बाहेर भाडेतत्त्वावर घरे उपलब्ध करुन दिली जातील. तसेच धारावी पूनर्विकास प्रकल्पासाठी मुलुंड येथील ५८ एकर मिठागरांची जागा देखील उपलब्ध झाली आहे. यास मुलुंडमधील रहिवाशांकडून प्रचंड विरोध आहे. अनेकदा येथील रहिवाशांनी एकत्र येत आंदोलने देखील केली. धारावीतील अपात्र झोपडीधारकांचे मुलुंडमध्ये पूनर्वसन झाल्यास येथील पायाभूत, सामाजिक, आर्थिक सुविधांवर
ताण येणार असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. मागील काही वर्षांमध्ये मुलुंड भागात वसाहत वाढत आहे. पाणी पुरवठा, रस्ते, वाहतूक, आरोग्य सुविधा या मर्यादित आहेत. अपात्र रहिवाशांचे पूनर्वसन या भागात झाल्यास गंभीर पर्यावरणीय समस्येला येथील नागरिकांना सामोरे जावे लागू शकते. मुसळधार पावसात मिठागरांमध्ये अतिरिक्त पाणी साठते. पुनर्विकास धारावीमध्येच का करू शकत नाही, सरकार कोणावर मेहरबानी करीत आहे? आणि मुलुंडकरांवर अन्याय करीत आहे. हा अट्टाहास का? असा सवाल मुलुंडकर करत आहेत.



