स्वातंत्र्यदिनी युवाशक्तीचा जागर; ‘ओळख स्वतःची, जिद्द यशाची’चा नारा देत १० लाईटहाऊस केंद्रांत जनजागृती रॅली..

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. १६ ऑगस्ट २०२६ स्वातंत्र्यदिनानिमित्त युवकांच्या उत्साहाने आणि एकजुटीने पिंपरी चिंचवड शहर दुमदुमून गेले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) आणि लाईटहाऊस कम्युनिटीज् फाउंडेशन (LCF) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या १० लाईटहाऊस कौशल्य विकास केंद्रांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त पिंपरी, चिंचवड, निगडी, आकुर्डी, नेहरूनगर, भोसरी, किवळे, बोऱ्हाडेवाडी, चिखली आणि दापोडी या भागांमध्ये एकाच वेळी जनजागृती रॅली काढण्यात आल्या. जवळपास ४०० युवकांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला.
ध्वजारोहणानंतर सुरू झालेल्या या रॅलीमध्ये युवकांनी एकाच रंगाच्या पोशाखात खांद्याला खांदा लावून सहभाग घेतला. “ओळख स्वतःची, जिद्द यशाची” अशा उत्साहवर्धक घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कौशल्यविकास, रोजगार, युवक सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
रॅलीदरम्यान लाईटहाऊसचे कर्मचारी, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांनी युवकांना उपलब्ध कौशल्यविकास व रोजगाराच्या संधींबाबत माहिती दिली. नागरिकांनीही रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत युवकांच्या उपक्रमाला प्रोत्साहन दिले.
लाईटहाऊस कम्युनिटीज् फाउंडेशन आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भागीदारीच्या कौशल्यम कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील १३,००० हून अधिक युवकांना मार्गदर्शन व प्रशिक्षणाचा लाभ मिळाला असून, त्यापैकी ६,४०० हून अधिक युवकांना रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संधींशी जोडण्यात आले आहे.
स्वातंत्र्याचा उत्सव, युवकांच्या सक्षमीकरणाचा संदेश
या रॅलीच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासोबतच युवकांनी स्वतःची क्षमता ओळखावी, आवश्यक कौशल्ये आत्मसात करावीत आणि आत्मविश्वासाने स्वावलंबी भविष्य घडवावे, हा संदेश देण्यात आला.



