
प्रतिनिधी पुणे दि. १० सप्टेंबर २०२६ मराठी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील मागण्यांबाबत आंदोलनकर्त्यांची मंत्रालयात सकारात्मक चर्चा; सांस्कृतिक धोरण २०२४च्या अंमलबजावणीसाठी उद्या RTI टाकणार
मराठी चित्रपट, नाट्य आणि लोककला क्षेत्रातील कलाकारांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या ‘मराठी फिल्म इंडस्ट्री बचाव आंदोलना’च्या प्रतिनिधी मंडळाने आज शासनाच्या विविध स्तरांवर महत्त्वपूर्ण भेट आणि चर्चा केली. महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनांच्या प्रतीसह आंदोलकांनी जुने सचिवालय, मंत्रालय आणि रविंद्र नाट्यमंदिर येथे विविध अधिकाऱ्यांशी व लोकप्रतिनिधींशी संवाद साधला.
दिवसभरातील प्रमुख घडामोडी व चर्चा:
सर्व ३६ जिल्ह्यांत वर्षातून दोनदा नाट्य स्पर्धांची मागणी:
जुने सचिवालय येथे सांस्कृतिक विभागाचे श्री. प्रशांत खेडेकर सर यांची भेट घेऊन १६ मागण्यांपैकी ४ प्रमुख मागण्यांवर (नाट्य, नृत्य, एकांकिका व लेखन स्पर्धा) सविस्तर चर्चा झाली. सध्या २४ जिल्ह्यांत होणारी हौशी राज्य नाट्य स्पर्धा सर्व ३६ जिल्ह्यांत वर्षातून दोनदा आयोजित करावी, तसेच महाविद्यालयांपुरती मर्यादित असलेली एकांकिका स्पर्धा सर्वांसाठी खुली करावी, या मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका दर्शवली आहे.
पारदर्शक वितरण व्यवस्थेबाबत आश्वासन:
दुपारी मंत्रालयात सांस्कृतिक विभागाचे सचिव श्री. कुलकर्णी यांची भेट घेण्यात आली. मराठी चित्रपटांच्या पारदर्शक वितरण व्यवस्थेबाबत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन देत त्यांनी माननीय आमदार श्री. आशिष शेलार यांच्यासोबत विशेष बैठकीचे नियोजन करणार असल्याचे सांगितले.
आमदार आशिष शेलार यांच्याशी प्राथमिक चर्चा:
संध्याकाळी रविंद्र नाट्यमंदिर येथे श्री. आशिष शेलार यांची भेट घेऊन आंदोलनाच्या पार्श्वभूमीची माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ आपल्या स्वीय सहाय्यकाला (PA) आंदोलकांच्या प्रतिनिधींना सविस्तर बैठकीसाठी वेळ देण्याचे निर्देश दिले.
उद्याचा महत्त्वाचा टप्पा — माहितीचा अधिकार (RTI):
सांस्कृतिक धोरण २०२४ जाहीर होऊन दोन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, या धोरणाची प्रत्यक्षात किती अंमलबजावणी झाली, कोणते निर्णय झाले आणि कोणते प्रस्ताव प्रलंबित आहेत, याची अधिकृत माहिती मिळवण्यासाठी उद्या जुने सचिवालय व मंत्रालय सचिव कार्यालयात माहितीच्या अधिकाराखाली (RTI) अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
आंदोलन समन्वयक व आभार:
आजच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यासाठी मुंबई समन्वयक श्री. गणेश तळेकर, सौ. सीमा अहिरे, उपनगर समन्वयक श्री. शिरीष म्हात्रे, नाशिक समन्वयक श्री. उमेश पंडित, कोल्हापूर समन्वयक श्री. सतीश आंबर्डेकर व श्री. सागर खडके, पुणे समन्वयक श्री. सचिन पिंपरीकर आणि सातारा समन्वयक श्री. प्रसाद इंगवले यांच्यासह सर्व सहकाऱ्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
“हा लढा केवळ आंदोलनापुरता मर्यादित नसून ठोस निर्णय आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून घेण्यासाठी आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आमचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच राहील. असे मराठी फिल्म इंडस्ट्री बचाव अंदालोन कमिटीने सांगीतले.



