आरोग्यमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म.न.पा. प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाय योजना कराव्यात..आयुक्त शेखर सिंह

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १४  जुलै  २०२३ लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाय योजना कराव्यात, असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

         लम्पी हा प्रामुख्याने मोठ्या जनावरांमध्ये आढळून येणारा आणि  जलदगतीने प्रसारित होणारा  विषाणूजन्य चर्म रोग आहे. या आजाराचा संसर्ग वाढू नये यासाठी राज्य शासनाच्या पशु संवर्धन विभागाच्या सहकार्याने महापालिकेच्या वतीने उपाय योजना करण्यात येत आहे. या कामकाज नियोजनाचा आढावा आज आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

महापालिकेच्या पिंपरी येथील  मुख्य प्रशासकीय इमारतीत आज बैठक पार पडलेल्या या बैठकीस पशुवैद्यकीय विभागाचे उपआयुक्त संदिप खोत, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, विशेष अधिकारी किरण गायकवाड तसेच संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

लम्पीचा संसर्ग रोखण्यासाठी जनावरांचे  प्रतिबंधात्मक लसीकरण करणे, शहरातील विविध भागात धुरीकरण करणे, आजाराची लक्षणे आढळून आलेल्या जनावरांवर तात्काळ वैद्यकीय उपचार करणे, आदी सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी दिल्या.  

उपआयुक्त संदिप खोत म्हणाले, महापालिका कार्यक्षेत्रात आज अखेर २७ जनावरांमध्ये लम्पी आजाराची लक्षणे आढळून आली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या आजाराचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण, उपचार आणि तपासणीकरिता पशुवैद्यकीय विभागाने दोन पथके कार्यान्वित केली आहेत. ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून जनावरांच्या मालकांना आजाराबद्दल माहिती देऊन काळजी कशी घ्यावी याबाबत जागृती करण्यात येत आहे. पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार जनावरांचे लसीकरण करून घेण्याच्या सूचना देखील त्यांना देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाकडून महापालिकेला एक हजार प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. लम्पी आजाराबाबत महापालिका प्रशासनाकडून आवश्यक उपाय योजना करण्यात आल्या असुन आजाराचा फैलाव होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!