दलदलीत अडकलेल्या व्यक्तीची अग्निशमन दलाच्या जवानांनी केली सुखरूप सुटका.

प्रतिनीधी पिंपरी चिंचवड पिंपरी, दि. २१ जुलै २०२३ निगडी प्राधिकरण येथे दलदलीत अडकलेल्या एका व्यक्तीची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. आज सकाळी
सव्वासातच्या सुमारास ही घटना घडली.
सकाळी सव्वासातच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथील मूकबधिर शाळेजवळील परिसरात असलेल्या दलदलीमध्ये एक गृहस्थ (अंदाजे वय ७० वर्षे) रूतले असल्याचे आरोग्य विभागाचे कर्मचारी विशाल साळवे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ ही वर्दी प्राधिकरण उप अग्निशमन केंद्राला कळवली.
वर्दी मिळताच उपअग्निशमन केंद्रातील तैनात सब ऑफिसर गौतम इंगवले यांच्या नेतृत्वाखाली लीडिंग फायरमन संपत गौंड, फायरमन काशिनाथ ठाकरे, ट्रेनी फायरमन अजय साळुंखे, वाहन चालक प्रदीप हिले यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. शिडी, दोर, सीलिंग आणि हुकच्या साहाय्याने पथकाने दलदलीत रुतलेल्या व्यक्तीची सुखरूपपणे सुटका केली.
सुटका केलेल्या गृहस्थाचे नाव निळकंठ पाटील असे आहे, अशी माहिती उप अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांनी दिली. सध्या पावसाळा सुरू असून काही मोकळ्या जागेत चिखलामुळे दलदलसदृश परिस्थिती
निर्माण होत असते. अशावेळी नागरिकांनी कोणतीही जोखीम न घेता सतर्क राहणे गरजेचे आहे.
कोणतीही अनुचित घटना निदर्शनास आल्यास महापालिकेच्या आपात्कालीन यंत्रणेला सुचना द्यावी,
असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले आहे.




