
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टी व नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही सरकारला गेले नऊ वर्षापासून जनता कंटाळली आहे व त्याचबरोबर या सरकारला विरोध करणारे नेते यांना देखील कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अडकवून आरोप लावणे, खटला चालविणे, धमकी देणे, देशद्रोही जाहीर करणे अशा प्रकारे छळवाद चालू आहे.
लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला अस्थिर करणे, काही तरी गंभीर आरोप लावून नेत्यांना आपल्या पक्षात सामील करून घेणे, नेता किती ही भ्रष्टाचारी असला तरी “भारतीय जनता पार्टी वाॅशिंग पावडर” मध्ये टाकून त्याची प्रतिमा स्वच्छ करणे, जाती धर्माच्या नावाने वाद निर्माण करणे, मणिपूर, हरियाणा जळत आहे तरीही वेगवेगळ्या राज्यात जाऊन निवडणूकीचा प्रचार करणे, दौर्यावर जाऊन प्रतिष्ठा मिळवण्यासाठी पुरस्कार घेणे, अशा प्रकारचे हुकूमशाहीचे व भावनाहिन सरकार भारतीय जनता पार्टी चालवत आहे.
भारतीय जनता पार्टीच्या विरोधी पक्षात काँग्रेस पक्षाचे नेतृत्व राहुल गांधी करत असताना मोदी सरकारने व गोदी मिडीयाने राहुल गांधी व त्यांच्या घराण्याबाबत टिका केली पण ज्या घराण्याने देशासाठी रक्त सांडले त्यांचे वारसदार राहुल गांधी असताना त्यांनी मोदी सरकारच्या अशा कोणत्याही टिकात्मक शब्दांकडे लक्ष न देता देशात प्रगती, शांतता, सांमजस्य व जनतेला कशा पद्धतीने मदत करता येईल याकडे लक्ष दिले.
राहुल गांधी यांनी जेव्हा “भारत जोडो यात्रा” सुरूवात केली तेव्हा भारतीय जनता पार्टी व सरकारने त्यांची चेष्टा केली. ऊन,वारा, पाऊस याचा विचार केला नाही आणि ‘कदम कदम मिलाये जा’ प्रमाणे अनेक राज्यांमधून ही यात्रा जात असताना गरीब, श्रीमंत, नोकरदार, व्यवसायिक, फौजी, शेतकरी, विद्यार्थी, महिला, अशा अनेक लोकांनी त्यांना साथ दिली. आणि “भारत जोडो यात्रा” यशस्वी झाली.
अदानीच्या सेल कंपनी मध्ये २० हजार कोटी कोणाचे असा प्रश्न राहुल गांधी यांनी लोकसभेत विचारला आणि हा प्रश्न हुकूमशहांना फार झोंबला. बदनामीची जुनी केस उकरून काढण्यात आली त्या केसवर सूरत येथे तत्परतेने निर्णय देत पूर्णच्या पूर्ण कालावधी म्हणजे दोन वर्षांची शिक्षा सुनावली लागोलाग लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विजेच्या चपळाईने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याची अधिसूचना काढली. गुजरात उच्च न्यायालयाने देखील ती शिक्षा कायम ठेवली.
पण ही सगळी लगबग सर्वोच्च न्यायालयाने धुळीस मिळवली. राहुल गांधी भोवती मोदी सरकारने त्यांना पूर्णपणे अडकविण्यासाठी चक्रव्यूव्ह रचले होते पण ज्या ठिकाणी सत्य आहे त्याठिकाणी असत्य जास्त काळ टिकाव धरत नाही. हुकूमशाहीच्या खोटेपणावर सर्वोच्च न्यायालयाने सोटा उगारला.
न्यायमूर्ती गवई यांनी राहुल गांधी यांना सुरत कोर्टात दिलेल्या दोन वर्षाच्या शिक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राहुल गांधी यांच्या कडून अभिषेक मनू सिंघवी यांनी केलेल्या युक्तीवादाला यश आले. यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी पुन्हा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे काँग्रेस व महाविकास आघाडीला ही मोठी बातमी असून सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.



