महाराष्ट्रराजकीयविशेषशहर

अजमेरा मोरवाडी येथील भूखंडाची राज्याचे कामगार कल्याण मंत्री डॉ.सुरेश खाडे यांच्याकडून पाहणी

प्रतिनिधी पिंपरी, दि. २८ ऑगस्ट २०२३ जागा हस्तांतरणाच्या मोबदल्यात पिंपरी चिंचवड महापालिकेकडून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला देण्यात येणा-या अजमेरा मोरवाडी येथील भूखंडाची पाहणी आज राज्याचे कामगार कल्याण मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केली.
या भूखंडावर राबविण्यात येणा-या बहुउद्देशीय प्रकल्पाबाबत सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश डॉ. खाडे यांनी यावेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या प्रशासनाला दिले. या पाहणी दौ-यावेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे मुंबई येथील कल्याण आयुक्त रविराज इळवे, पुण्याचे सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील, कामगार कल्याण अधिकारी समाधान भोसले यांच्यासह महापालिकेचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार सरनाईक, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता रवींद्र पवार, राजेंद्र शिंदे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, प्रशासन अधिकारी मुकेश कोळप, उप अभियंता सुभाष काळे, सहाय्यक नगररचनाकार अक्षय कुंभार, सर्व्हेअर घनश्याम गवळी, सहाय्यक उद्यान अधिक्षक राजेश वसवे तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी उपमहापौर केशव घोळवे, तुषार हिंगे, माजी नगरसेवक शंकर जगताप, नामदेव ढाके, अनुराधा गोरखे आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील विविध भूखंडासंदर्भात महापालिका आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्यामध्ये जागा हस्तांतरणाच्या बाबत करारनामे झालेले आहेत. यातीलच पिंपरी मधील मोरवाडी अजमेरा येथील भूखंड महापालिकेकडून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळास देण्यासंदर्भात कार्यवाही प्रस्तावित आहे. या भूखंडावर कामगार कल्याण मंडळाच्यावतीने कामगार कल्याणासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने महापालिका आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत कामगार कल्याण मंत्री डॉ. खाडे यांनी या जागेची पाहणी केली. या जागेवर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत विविध सूचना डॉ. खाडे यांनी कामगार मंडळ प्रशासनाला केल्या तसेच जागा हस्तांतरणाच्या सद्यस्थितीबाबत देखील त्यांनी माहिती घेतली.
दरम्यान, संभाजीनगर मधील कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयात कामगार मंत्री डाॅ. खाडे यांनी महापालिका आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक घेऊन आढावा घेतला तसेच जागा हस्तांतरण आणि प्रस्तावित उपक्रमाबाबत विविध सूचना केल्या. महापालिका आणि कामगार कल्याण मंडळामध्ये झालेल्या करारनाम्यासंदर्भात तसेच जागा हस्तांतरणाबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे तसेच भूमी व जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार सरनाईक यांनी कामगार मंत्री डॉ. खाडे यांना सविस्तर माहिती दिली. बैठकीस कामगार कल्याण मंडळाच्या अधिकाऱ्यांसह महापालिकेचे कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे, राजेंद्र शिंदे, उपअभियंता विजय भोजने, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, प्रशासन अधिकारी मुकेश कोळप आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button