“ पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा”..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.०३ सप्टेंबर २०२३ पिंपरी चिंचवड शहरात पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल ऋषीकेश गजानन अरणकल्ले यांना २०२० – २०२१ या वर्षीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सोमवार दिनांक २८/०८/२०२३ रोजी बालेवाडी क्रीडा नगरी येथे मल्लखांब या क्रीडा प्रकारात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ऋषीकेश अरणकल्ले हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षास नेमणुकीस आहेत. त्याचे गाव पुणे जिल्हयातील इंदापूर येथील आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण निगडी पुणे येथील ज्ञान प्रबोधिनी शाळेत झाले आहे. तेथे त्यांना मल्लखांब खेळण्याची आवड लागली त्यानंतर ते पुढील शिक्षणा करिता महाराष्ट्र मंडळ, पुणे शहर येथे गेले तेथे त्यांनी उत्तम प्रकारे सराव केला दरम्यान त्यांनी जिल्हा, राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग घेवून त्यांनी अनेक बक्षिसे मिळवली आहेत.
सन २०१४ साली ते मल्लखांब या खेळ कोटयातुन सातारा पोलीस दलात रुजु झाले. सातारा पोलीस दलात असताना त्यांनी सन २०१७ मध्ये मध्यप्रदेश मधील उज्जैन येथे झालेल्या ३३ वी राष्ट्रीय वरिष्ठ पुरुष मल्लखांब अजिंक्य पद स्पर्धेत सांघिक सुवर्ण पदक तसेच पोल मल्लखांब प्रकारात कास्यपदक मिळविले. सातारा पोलीस दलात ०४ वर्षे काम केल्यानंतर सन २०१८ साली त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात बदली केली. त्यानंतर पुढील ०४ वर्षे, त्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस दलाकडून राष्ट्रीय स्पर्धाना गवसणी घातली.
सन २०१८ मध्ये फोंडा गोवा येथे झालेल्या ३५वी राष्ट्रीय अजिंक्य मल्लखांब स्पर्धेत सांधिक सुवर्ण पदक आणि टांगता मल्लखांब प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. सन २०२२ मध्ये उज्जैन मध्यप्रदेश येथे झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय अजिंक्य पदक मल्लखांब स्पर्धेत सांघिक सुवर्ण पदक मिळवले. नोकरी आणि कौटुंबिक जबाबदारी सांभाळत सराव सुरू असुन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय
स्पर्धा खेळण्याची धडपड आणि जिद्द कायम असल्याने ऋषीकेश अरणकल्ले यांना सन २०२०-२०२१ चा मल्लखांब या क्रीडा प्रकारात शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने मा. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, मा. पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, मा.अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे मॅडम यांनी सत्कार करून कौतुक केले. तसेच पुढील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा करिता शुभेच्छा दिल्या आहेत. स्पर्धांच्या सराव करण्या करिता पुरेसा वेळ मिळावा म्हणून कायम स्वरुपी विशेष सवलत देण्याची घोषणा केली आहे.




