“सरकारच्या पोटातलं ओठावर आले”.. सतीश काळे.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड १५ सप्टेंबर २०२३ मराठा आरक्षणाचा लढा राज्यात तीव्र प्रमाणात सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक बांधवांनी या लढ्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. नुकतेच मनोज जरांगे पाटील यांनीही जीवाची पर्वा न करता आमरण उपोषणाचा मार्ग निवडला होता. या आंदोलनाची दाहकता वाढत असताना राज्य सरकारला मात्र गांभीर्य नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पत्रकार परिषदेपुर्वीचे संभाषण राज्यभर व्हायरल झाले. त्यांना या आंदोलनाचे गांर्भीय नसून पोरखेळ वाटतं आहे राज्यकर्त्यांचे हे वागणं चीड आणणारे आहे. या सत्ताधाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत मराठा समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया, मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलनकर्ते सतिश काळे यांनी दिली आहे. तसेच मराठा समाजाच्या आंदोलनासाठी लढा तीव्र ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सतिश काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण केले होते. त्यांची प्रकृती खालावली होती. त्या दरम्यान मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यामध्ये आपण बोलून मोकळ व्हायचे आणि निघून जायचे असा संवाद या तीघांचा व्हायरल झाला. माईक चालू असल्याचे लक्षात येताच तीघांनीही सावध पवित्रा घेतला. मात्र तोपर्यंत या तिघांना मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेल्या आंदोलनाचे किती गांभीर्य आहे हे सर्व महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यांना येणाऱ्या निवडणूकीत मराठा समाज योग्य तो धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे काळे म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत काय कार्यवाही करण्यात येईल, याचा विचार करण्याकरिता राज्य सरकारने एक महिना मुदत मागितली होती. त्यानंतर समाज बांधवांच्या विनंतीला मान देऊन मनोज जरांगे यांनी देखील उपोषण तात्पुरते स्थगित केले असून यापुढे एक महिना धरणे आंदोलन करणार आहेत, पिंपरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात शहरातील मराठा समाजासह सर्व सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा मार्ग निवडला. शहर बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दिला होता. सध्या राज्य सरकारने एक महिना मुदत मागितल्यामुळे आंदोलन स्थगित केले आहे. मात्र या एका महिन्यात सातत्याने विविध मार्गाने आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे काळे म्हणाले. आंदोलनाचा लढा आरक्षण मिळेपर्यंत तीव्र करणार असल्याचे काळे म्हणाले.



