बागेश्वर धाम सरकार यांचा सत्संग मेळावा म्हणजे प्रगतशील पुण्याला अधोगतीकडे घेऊन जाणारा कार्यक्रम – उमेश चव्हाण

प्रतिनिधी पुणे दि. १९ नोव्हेंबर २०२३ भोंदूगिरी आणि कर्मकांडाच्या विरुद्ध आपल्या अभंगवाणीतून प्रबोधन करणारे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे छत्रपती शिवरायांचे गुरु आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी ओसाड अप्रगत झालेल्या पुण्यात सोन्याचा नांगर फिरवून शेतकरी आणि कामगारांना अभय दिले, संरक्षण दिले. पुणे शहर ही समाज सुधारकांची भूमी आहे. गोखले, रानडे, आगरकर यांची भूमी आहे. स्त्री शिक्षणावरील बंदीला झुगारून याच पुणे शहरातील भिडे वाड्यात क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. धार्मिक रुढींनी स्त्रियांना नाकारलेला शिक्षणाचा अधिकार महात्मा फुलेंनी मिळवून दिला, पुण्यातील थोर राष्ट्रीय सुधारकांमुळे स्त्रियांची, तरुणांची समाजाची प्रगती झाली मात्र समाजसुधारकांच्या या पुण्यभूमीमध्ये अंधश्रद्धा पसरवणाऱ्या बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध झालेल्या बाबाच्या सत्संग मेळाव्यामुळे पुणे शहर मोठ्या अधोगती कडे जाईल, अशी भीती रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी व्यक्त केली.
सुमारे दोनशे वर्षांपूर्वी याच पुण्यात डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. दोनशे वर्षांपूर्वी त्यांनी उपास तपास कर्मकांड सोडून शिक्षणाची कास धरून त्या विज्ञानवादी बनल्या, विज्ञान शाखेतील वैद्यकीय पदवी त्यांनी प्राप्त केली. मात्र पुण्यातील राजकारणी मंडळी येथील स्त्रियांना, तरुणांना धाडसी, बळकट बनवण्याच्या ऐवजी तुमचे प्रश्न आणि संकटे सोडवण्यासाठी भोंदू बाबाच्या नादी लागा, असा संदेश देत असतील तर पुण्याचे सामाजिक आरोग्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही असेही परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले.
पुढे ते हे ही म्हणाले की, बागेश्वर धाम याने संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची प्रचंड बदनामी केलीय. कांदा आणि लसूण राक्षसांच्या विष्ठेपासून तयार झालेली वनस्पती आहेत, असे विज्ञानाला नाकारणारे अकलेचे तारे तोडले आहेत. समाज सुधारकांच्या या पुणे शहरांमध्ये असे भोंदूगिरीचे कार्यक्रम आयोजित करून कोणी पराभूत उमेदवार खासदार होण्याचे केविलवाणे प्रयत्न करीत असले तरी सुज्ञ पुणेकर अधोगतीचा मार्ग स्वीकारणार नाहीत अशी खात्रीही रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी व्यक्त केली.