प्रवासी संख्या कमी होत असल्याने पूणे मेट्रो समोर मोठे आव्हान, प्रवासी संख्येला लागली घरघर..
प्रतिनिधी पूणे दि. ४ डिसेंबर २०२३ पुणे मेट्रोची विस्तारित मार्गांवरील सेवा सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली होती. वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी ते जिल्हा न्यायालय या विस्तारित मार्गांवरील प्रवासी संख्येला आता घरघर लागल्याचे समोर आले आहे. मेट्रोची प्रवासी संख्या नोव्हेंबर महिन्यात १४ लाखांवर आली असून, उत्पन्न २ कोटी २० लाख रुपयांवर घसरले आहे.
मेट्रोची विस्तारित सेवा ऑगस्टपासून सुरू झाली. वनाझ ते रुबी हॉल हा ९.७ किलोमीटरचा मार्ग आणि पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय हा १३.९ किलोमीटरचा मार्ग सुरू झाला. मेट्रोतून ऑगस्ट महिन्यात २० लाख ४७ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता आणि त्यातून मेट्रोला ३ कोटी ७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. नंतर सप्टेंबर महिन्यात प्रवासी संख्या २० लाख २३ हजार होती आणि उत्पन्न २ कोटी ९८ लाख रुपये होते. आता ती कमी कमी होत असल्याचे दिसून येत आहे, नव्याची नवलाई चारच दिवसात संपताना दिसत आहे.