जळीत रुग्णांसाठी म.न.पा.चे रुग्णालय (बर्न हॉस्पिटल) सुरू करणे बाबत प्रशासकांना ईमेल द्वारे काॅंग्रेसचे निवेदन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.१२ डिसेंबर २०२३ मा. आयुक्त साहेब यांना मेल द्वारे पिंपरी चिंचवड शहरात जळीत रुग्णांसाठी महानगरपालिकेचे मालकी हक्काचे रुग्णालय (बर्न हॉस्पिटल) सुरू करणेबाबतच्या मागणीचे निवेदन शहर कॉंग्रेस च्यावतीने देण्यात आले.
माहिती
पिंपरी चिंचवड शहराची देशात औद्योगिक नगरी म्हणून ओळख आहे. शहराची लोकसंख्या अंदाजे तीस लाख. देशाच्या कानाकोपऱ्यातून कामासाठी आलेले उद्योजक व कामगार या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत तसेच नामांकित शिक्षण संस्था ही आहेत. त्यामुळे या शहराला मिनी इंडिया म्हणून ओळखले जाते. राज्यातील इतर शहरापेक्षा फार मोठी एमआयडीसीया शहरात आहे. या शहरातील एमआयडीसीत नामांकित कंपन्या छोटे-मोठे उद्योग, आय.टी. पार्क असून हे शहर सुनियोजित व समृद्ध आहे. हे शहर स्मार्ट सिटीत गणले जाते. आशिया खंडात श्रीमंत म्हणून आपली महानगरपालिका नावाजलेली आहे.
शहरातील नागरिकांना महानगरपालिकेच्या वतीने सर्व मूलभूत सुविधा पुरविल्या जातात. वाय.सी.एम. हॉस्पिटल सारखे सुसज्ज हॉस्पिटल आपल्याकडे आहे, या व्यतिरिक्त क्षेत्रीय कार्यालय हद्दी अंतर्गत सुद्धा मोठ मोठी हॉस्पिटल महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेली आहेत.
वरील सर्व बाबी खऱ्या असल्या तरी पण खेदाने सांगावेसे वाटते की, एवढ्या मोठ्या लोकवस्तीच्या शहरात सर्व सुविधा असताना साधे एक जळीत रुग्णांसाठी रुग्णालय (बर्न हॉस्पिटल) नाही. याबाबतची उणीव शुक्रवार दिनांक ०८ डिसेंबर, २०२३ रोजी तळवडे येथील राणा इंजिनियरिंग या फटाक्याच्या कारखान्याला लागलेली आग व त्या आगीत निष्पाप महिला कामगारांचा झालेला मृत्यू या घटनेमुळे झाली. या घटनेतील जख्मींना त्वरित उपचार मिळाले असते तर कदाचित त्यांचे जीव वाचले असते, पण आपल्याकडे जळीत रुग्णांसाठी रुग्णालयाची (बर्न हॉस्पिटल) सुविधा नसल्याने ससून हॉस्पिटल, पुणे येथे त्यांना उपचारासाठी पाठवण्यात आले, त्यामुळे त्यांना उपचार मिळण्यास उशीर झाला होता.
आपण कार्यक्षम व संवेदनशील सरकारी अधिकारी असल्याने या (ईमेल) पत्राद्वारे आपणास विनंती करतो की, आपल्या कार्यकाळात या शहरात एक सुसज्ज असे जळीत रुग्णांसाठी रुग्णालय (बर्न हॉस्पिटल) व्हावे. असे अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काॅंग्रेस कमिटी डाॅ. कैलास कदम यांनी ईमेल द्वारे प्रशासनास कळविल्याचे दिसते आहे.




