कारसाठी पैसे न दिल्याने नवविवाहितेचा गळा चिरून खून; पतीचाही जीवन संपविण्याचा प्रयत्न..

प्रतिनिधी वाशीम दि. २९ जानेवारी २०२४ कार घेण्यासाठी मामाकडून ५ लाखांची मागणी करणाऱ्या पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. ही धक्कादायक आणि संतापजनक घटना वाशिम तालुक्यातील वाघजाळी येथे शनिवारी दि.२७ रोजी सकाळी घडली. तर संशयित पती गजानन शिंदे यांनी आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. त्याला वाशिम येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मेघा उर्फ रेवती गजानन शिंदे रा. वाघजाळी असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी गजानन खंडूजी घुले रा. चिखली बु. यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गजानन घुले यांची भाची मेघा उर्फ रेवती हिचे लग्न वाघजाळी येथील गजानन बबन शिंदे याच्यासोबत दि.१ जून २०२३ रोजी झाले होते. दरम्यान, पती गजानन शिंदे, सासरे बबन श्यामराव शिंदे, सासू पार्वती बबन शिंदे सर्व रा. वाघजाळी यांनी कार घेण्याकरिता मामाकडून ५ लाख आणण्याचा तगादा मेघा उर्फ रेवतीकडे लावला होता. या कारणावरून तिचा सतत शारीरिक व मानसिक छळ सुरू होता. भाचीला होत असलेल्या त्रासाला कंटाळून मामाने मागील दिवाळीपूर्वी चेकद्वारे २ लाख आणि नगदी ५० हजार रुपये दिले होते. तरी सुद्धा सासरच्या मंडळींनी तिला त्रास देणे सुरूच ठेवले होते.
दरम्यान, शनिवारी दि.२७ रोजी सकाळी गजानन शिंदे याने वाघजाळी येथील राहत्या घरी धारदार शस्त्राने मेघा हिच्या गळ्यावर वार करून खून केला. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून सासरे बबन श्यामराव शिंदे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर संशयित आरोपी गजानन शिंदे यांनी आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला होता. त्याला वाशिम येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.



