प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १२ फेब्रूवारी २०२४ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी वाघेरे विभागात ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर बाह्य रुग्णालय’ हे रुग्णालय आहे. त्या रुग्णालयाला दिलेले बाबासाहेबांचे नाव बदलून त्याठिकाणी केंद्र सरकारच्या योजनेचा फलक लावण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. संपुर्ण विश्वासाठी प्रेरणादायी असणाऱ्या बाबासाहेबांच्या नावाचे महापालिकेला वावडे का? देशासाठी मोठे योगदान देणाऱ्या महापुरुषाचा महापालिकेकडून जाणिवपूर्वक अवमान का करण्यात येतोय? असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तरी सदरील प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे’ नाव पुन्हा रुग्णालयास देण्यात यावे अन्यथा महापालिका प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी दिला आहे.
याबाबत दिपक खैरनार यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी महापालिकेकडून पिंपरी वाघेरे येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर बाह्य रुग्णालयाच्या संपूर्ण इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली, यावेळी सदर इमारतीला असणारे बाबासाहेबांचे नावही पुसण्यात आले. पूर्ण काम झाल्यानंतर पुन्हा रुग्णालयाला बाबासाहेबांचे नाव देणे अपेक्षित होते. परंतु तसे न होता त्या ठिकाणी मनपा प्रशासनाकडून केंद्र शासनाच्या ‘आयुष्मान आरोग्य मंदीर’ अशा आशयाचा फलक लावण्यात आला आहे. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवा-उडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. शासनाच्या योजनेस आमचा विरोध नाही परंतू अशा प्रकारे महापुरुषाचे नाव बदलणे अत्यंत चुकीचे आहे. या संपूर्ण प्रकारातून सामाजिक एकात्मता आणि सामाजिक सलोखा भंग करण्याचा हेतू दिसून येत आहे.त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून यात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन सदरील रुग्णालयाचे नाव ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर बाह्य रुग्णालय’ हे पूर्ववत करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.