प्रतिनिधी शिरूर दि. २१ फेब्रूवारी २०२४ माती शिवाय झाड, झाडाशिवाय फुल असं चुकूनही घडत नाही..
सुकून जाईल याच भीतीने मला आवडत असूनही मी फुल तोडत नाही… प्रेम, मैत्री, जिव्हाळा उदात्त भावनेचा उत्कट काव्याविष्कार वाडिया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अनुभवयास मिळाला, प्रा. सुमित गुणवंत आणि डॉ. महादेव रोकडे यांनी आपल्या वेगवेगळ्या कवितांच्या माध्यमातून सभागृहात जोशपूर्ण उत्साहाच वातावरण निर्माण करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. दोन पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कविता विद्यार्थ्यांनी अनुभवल्या. व मनसोक्त कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
प्रा. सुमित म्हणाले की “माणूस प्रेम केल्यावरच माणसासारखं वागतो. जात, धर्म, रंग, रूप, वर्ण, पंथ, भाषा असलं काहीच पाहत नाही तो फक्त माणूस म्हणून माणसावर प्रेम करतो” प्रेम करणे हे माणूस असल्याचं लक्षण आहे. निमित्त होते मॉर्डन एज्युकेशन सोसायटीच्या नेव्हील वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्ज पुणेच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिर. वाडिया इन्स्टिट्यूट ने हे सात दिवसीय शिबिर तरडोबाची वाडी शिरूर येथे आयोजित केलेले आहे.
या शिबिराच्या तिसऱ्या दिवशीच्या संवाद सत्रामध्ये प्रमुख वक्ते म्हणून राजमाता जिजाऊ महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. सुमित गुणवंत आणि टी. जे कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख डॉ. महादेव रोकडे हे निमंत्रित होते. डॉ. रोकडे यांनी आपल्या कवितेतून तंत्रज्ञानाच्या युगात माणसाने माणसावर प्रेम करणे विसरू नये. आनंदी कसे जगावे ? याचा कानमंत्रच विद्यार्थ्यांना दिला.
या निमित्ताने इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. आनंद दडस उपस्थित होते. त्यांनीही राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. दडस म्हणाले की आजच्या पिढीला माणूस वाचता आला पाहिजे. त्यासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबरच अनुभवाची शिदोरीही सोबत असायला हवी. म्हणून ह्या कवितांचा कार्यक्रम आयोजित केला होता. असे कार्यक्रम वारंवार होणे गरजेचे आहे.
या शिबिरासाठी ग्रामस्थांचे चांगले सहकार्य मिळत आहे.
या कार्यक्रमाला रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास डोळे, रासेसो सह कार्यक्रम अधिकारी प्रा. ओमप्रकाश शिवपूजे, प्रा. वैजीनाथ दिघे, डॉ. राधा लुईस इत्यादी प्राध्यापक उपस्थित होते.