सत्यशोधक चित्रपटातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन वसंत (नाना) लोंढे प्रतिष्ठानचा उपक्रम..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २३ फेब्रुवारी २०२४ क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट उलगडून सांगणारा, समाज प्रबोधन करणारा ‘सत्यशोधक’ हा चित्रपट आहे. तो पाहून शिक्षणाची प्रेरणा घ्यावी आणि उत्तुंग यश साध्य करावे, या उद्देशाने भोसरीतील महात्मा फुले जागृती शिक्षण मंडळाच्या प्राथमिक शाळेतील ५०० विद्यार्थ्यांना वसंत (नाना) लोंढे प्रतिष्ठानच्या वतीने चित्रपट मोफत दाखवण्यात आला.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ज्येष्ठ माजी नगरसेवक वसंत लोंढे, सुलोचना लोंढे, माजी नगरसेवक सुरेश तात्या म्हेत्रे, महात्मा फुले जागृती शिक्षण मंडळचे अध्यक्ष निळकंठ लोंढे, उपाध्यक्ष विश्वनाथ लोंढे, मुख्याध्यापक मोहन वाघुले, सुलभा चव्हाण, कलाकार पायल साळुंखे, संदीप जोशी, सुहास वैद्य, प्रवीण खरडे, निर्माता प्रवीण तायडे, आप्पा बोराटे, बाळासाहेब बांगर आदी उपस्थित होते.
यावेळी निर्माता आणि कलाकार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निर्माता बाळासाहेब बांगर यांनी यावेळी सांगितले की, या चित्रपटाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून होते. या चित्रपटात क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा समतेचा संदेश देणारा संघर्षमय आणि त्यागमय जीवनपट दाखवण्यात आला आहे. कर्मकांडाचा विरोध करीत क्रांतिकारी लढा त्यावेळी फुले दांपत्यांनी उभारला. यामध्ये देशातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमाबी शेख, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे या लढ्यातील योगदान देखील उत्तमरीत्या सादर करण्यात आले आहे. या चित्रपटाचा समारोप समाजाच्या उद्धाराचा ध्यास घेतलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती देऊन केला आहे.
शनिवारी चित्रपट प्रदर्शनाचा सुवर्ण महोत्सवी दिवस असून सर्व वयोगटातील नागरिकांनी हा चित्रपट पहावा असे आवाहन बाळासाहेब बांगर यांनी केले.