प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २८ मार्च २०२४ वाकड येथील विलास जावडेकर इन्फिनिटी प्रा.लि. टीडीआर घोटाळ्यामध्ये सहभागी असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घातले जात आहे. भ्रष्टाचारी अधिकारी महापालिकेचे जावई असल्याप्रमाणे वावरत आहेत. त्यांच्यावर कारवाई न केल्यास आगामी काळात संभाजी ब्रिगेड स्टाईल आक्रमक आंदोलन छेडणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला. वाकडमधील तब्बल दीड हजार कोटी रुपयांच्या टीडीआर घोटाळ्या प्रकरणी संभाजी ब्रिगेड संघटनेकडून महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणात संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण जिल्हा सचिव रावसाहेब गंगाधरे उपाध्यक्ष वैभव जाधव संघटक वसंत २पाटील,संदीप नवसुपे, संतोष शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते साखळी उपोषण करत आहेत आज या साखळी उपोषणाला पन्नास दिवस पूर्ण झाले आहे. तरी निरढावलेल्या प्रशासनाकडून अद्याप कारवाईची पावले उचलली गेली नाहीत. त्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने आक्रमक पावले टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
सतीश काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, टीडीआर घोटाळ्यामध्ये सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी संभाजी ब्रिगेडने साखळी उपोषण सुरू केले आहे. या पूर्वी महापालिकेत ये-जा करणाऱ्या आयुक्तांना मात्र सदरील आंदोलन दिसत नसल्याने त्यांना आंदोलन दिसावे आणि त्यांनी या घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी आयुक्तांना जाड भिंगाचा ‘चष्मा’ भेट देऊन निषेध व्यक्त केला होता. तरी देखील आयुक्तांनी त्यावर कारवाई केली नाही. टीडीआर घोटाळ्यातील सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे.या बाबत वारंवार आवाज उठवूनही कार्यवाही केली जात नाही.त्यामुळे आता संभाजी ब्रिगेड स्टाईलने आक्रमक आंदोलन छेडून महापालिका प्रशासनाला वठणीवर आणण्याचे काम करू असा इशारा सतीश काळे यांनी दिला आहे.