नाशिककरांनो..आपल्याकडे आचारसंहितेचे पालन होते का..? तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक 1950
प्रतिनिधी रेणुका गायकवाड नाशिक दि. ०२ एप्रिल २०२४ आचारसंहितेतील गैरप्रकार रोखण्यासाठी व मतदारांना मतदानासंदर्भात पूर्ण माहिती मिळावी म्हणून नाशिक जिल्हा प्रशासन व निवडणूक आयोग यांचे मार्फत टोल फ्री क्रमांक सहित अतिरिक्त दोन दूरध्वनी क्रमांक नव्याने उपलब्ध करून देण्यात आले आहे.
नाशिक लोकसभेचे बहुतेक पक्षांचे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार अजूनही घोषित झालेले नाही, परंतु प्रशासकीय विभाग व निवडणूक आयोग निवडणुकांच्या तयारीला लागल्याचा दिसून येते नुकतच नाशिक जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आचारसंहिते दरम्यान व निवडणुकांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी व या संदर्भातील तक्रारींची नोंद करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्थापित केलेल्या आचारसंहिता कक्षातील 0253-2995671 आणि 0253-2995673 हे दोन दूरध्वनी कार्यान्वित केल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. जलज शर्मा यांनी कळविली आहे.
यासोबतच जिल्हा प्रशासनाने सामान्य नागरिकांना, नवीन मतदारांना 1950 हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे.
1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून नागरिकांना मतदानाची तारीख जाणून घेणे, मतदानाची वेळ माहित करून घेणे, मतदार यादीत नाव शोधणे, मतदान केंद्राचा सविस्तर तपशील जाणून घेणे, मतदार नोंदणीची ऑनलाइन प्रक्रिया, मतदानासाठी आवश्यक असलेले निवडणूक ओळखपत्रा व्यतिरिक्त निवडणूक आयोगाकडून विहीत केलेल्या इतर 12 ओळखपत्रांची माहिती घेणे यासारख्या विषयांवर चौकशी करून माहिती घेता येईल.
नागरिक 1950 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार हि नोंदवू शकतात, हा टोल फ्री क्रमांक 24 तास कार्यरत असल्याने सामान्य नागरिक व मतदारांनी आपल्या विभागात आचारसंहितेचे पालन न झाल्यास व अथवा गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनात आल्यास त्वरित टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून प्रशासनास याबाबतची माहिती द्यावी व आपल्या तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन नाशिक जिल्हा प्रशासनास व जिल्हा निवडणूक विभागामार्फत करण्यात आले आहे.