मारहाण करणाऱ्या भरारी पथकातील महिलांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा – ॲड. सचिन भोसले
गोरगरिबांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १७ जून २०२४ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण कारवाई करण्यासाठी नेमण्यात आलेल्या भरारी पथकातील महिलांनी सोमवारी दापोडी येथे अतिक्रमण कारवाई करीत असताना एका भाजी विक्रेत्या महिलेला अमानुषपणे मारहाण केली. मारहाण करणाऱ्या भरारी पथकातील या महिलांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी पिंपरी चिंचवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने शहरातील अतिक्रमण रोखण्यासाठी व अतिक्रमण कारवाई करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत ठेकेदारी पद्धतीने भरारी पथक नेमले आहेत. ही भरारी पथके भ्रष्ट अधिकारी व पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर कारवाई करण्याचा स्टंट करतात. धन दांडग्यांचे व्यावसायिक अतिक्रमणे सोयीस्करपणे दुर्लक्षित करून पोटाची खळगी भरण्यासाठी हातगाडी व पथारी लावून चरितार्थ चालवणाऱ्या गोरगरिबांवर कारवाई करून त्यांच्या मालाची नासाडी केली जाते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मागील अडीच वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. शहरात पार्किंगची व वाहतुकीची गंभीर समस्या आहे. पुणे मुंबई महामार्ग व शहरातील अनेक भागात व्यवसायिक इमारतींमध्ये पार्किंग क्षेत्रात बेकायदेशीर हॉटेल्स आणि इतर आस्थापना राजरोसपणे सुरू आहेत. मागील अडीच वर्षात या भरारी पथकाने अशा किती हॉटेलवर व बेकायदेशीर आस्थापनांवर कारवाई केली आहे हा संशोधनाचा भाग आहे. धनदांडग्या व्यवसायिकांना व विकसकांना पाठीशी घालून गोरगरीब जनतेवर अतिक्रमण कारवाईचा बडगा उगारणाऱ्या प्रशासनाचा पिंपरी चिंचवड उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. गोरगरिबांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचेही शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले यांनी सांगितले आहे.