आर्थिकघोटाळेमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

चिखलीत भंगार व्यापाऱ्यांनी हजारो कोटीचा जीएसटी बुडवला – पिंपरी चिंचवड परिवर्तन वाहतूक विकास आघाडीचा आरोप..

रॅकेटमध्ये व्यापाऱ्यांबरोबर जीएसटी अधिकाऱ्यांचा देखील समावेश..

जीएसटी विभागाची कार्यपद्धती संशयास्पद..
      
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.१९ जून २०२४ व्यापारी आणि जीएसटी विभागातील अधिकारी यांची भ्रष्ट युती झाली असून संगणमताने यांनी कोट्यावधी रुपयांच्या महसुलावर डल्ला मारला आहे. यामध्ये नुकसान झालेल्या ग्राहक व व्यापाऱ्यांना दिलासा देणे ऐवजी कोट्यावधीचा  महसूल स्वतःच्या घशात घालण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीचे शहर उपाध्यक्ष गोपाल कचवे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
    यावेळी पिंपरी चिंचवड परिवर्तन वाहतूक विकास आघाडीचे अमित मोहिते, झोपडपट्टी सेलचे शहर अध्यक्ष सागर जाधव, सामुहिक गुंडगिरी, दहशतवाद तंटा भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे  विशाल मिठे आदि उपस्थित होते.
   चिखली, कुदळवाडी येथील काही भंगार व्यवसाय करणारे व्यापारी मागील काही वर्षापासून जीएसटी अकाउंटच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून, बनावट नावाने, त्रयस्थ व्यक्तींच्या नावे जीएसटीचे खाते उघडून हजारो कोटी रुपयाची कर चोरी करीत असल्याचे माहिती कायद्याद्वारे मागवलेल्या माहितीतून सिद्ध झाले आहे. कर चोरी करणारे मोठे रॅकेट सक्रीय असून त्यांच्या माध्यमातून देशाच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम राजेरोसपणे सुरू आहे. यातुन अनेक उद्योजकांची फसवणुक केली जात आहे. ही बाब पुण्यातील जीएसटी विभागाचे अतिरिक्त महासंचालक देवेंद्र नागवेकर यांच्या निदर्शनास आणून देखील त्यांनी याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे असाही आरोप गोपाल कचवे यांनी यावेळी केला.
पुण्यातील जीएसटी विभागातील काही अधिकारी या रॅकेट मध्ये सहभागी असल्याने यात नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना न्याय मिळत नाही. अशा पद्धतीने राज्यातील ज्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असेल त्यांनी पिंपरी चिंचवड परिवर्तन वाहतूक विकास आघाडीशी संपर्क साधावा लवकरच याबाबत न्यायालयात दावा दाखल करण्यात येणार आहे. तसेच कर चुकवेगिरी करणाऱ्या संबंधित व्यापाऱ्यांवर अधिकाऱ्यांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा २१ जुलै पासून पुण्यातील जीएसटी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा पिंपरी चिंचवड परिवर्तन वाहतूक विकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.
     अशा पध्दतीने केली जाते फसवणूक
अनेकांच्या नावे बोगस कागदपत्रांच्या आधारे परस्पर अनेक बनावट कंपन्या सूरू करुन बिल विक्री करणे, हवाला मार्फत पैसे देवाण घेवाण करणे, नव – नविन बॅंक खाते वापरणे, मनी ट्रान्सफर मार्फत हवाला आणणे या माध्यमातून जीएसटीची चोरी केली जाते. यासाठी स्क्रॅप, प्लॅस्टिक, स्टिल, रिअल इस्टेट, मधील व्यावसायिकांना बनावट कंपनीची जीएसटीची बिले दिली जातात. अस्तित्वात नसलेल्या कंपन्याच्या बनावट देयकांच्या मदतीने खरेदी विक्रीचे खोटे व्यवहार कागदोपत्री उभे करुन त्याचे आपआपसात चक्रीय पध्दतीचे व्यवहार दाखवतात आणि त्या आधारे जीएसटी इनपुट क्रेडीट मिळवून वर्षाला हजारो कोटीची कर चोरी केली जाते. नंतर अधिकारी वर्गाच्या मदतीने उभ्या केलेल्या बनावट कंपन्या बंद करुन या प्रकरणातून सही सलामत सुटले जाते. 
रॅकेट मध्ये यांचा समावेशाचा कच्छवेंचा आरोप ?
अनेक वर्षापासून कुदळवाडी परिसरात एम. डी. कैश रहमानी नामक व्यक्तीकडून बनावट जीएसटी चोरीचे रॅकेट चालवले जात असल्याचा आरोप गोपल कच्छवे यांनी केला आहे.
रहमानी हा “आशिया स्टील ट्रेडर्स  या कंपनीचा मालक असून या कंपनीच्या शेकडो कोटी रुपयाच्या जीएसटी घोटाळ्यातील प्रमुख फरार आरोपी आहे. कैश रहिमान व त्याचे परप्रांतिय साथिदार गरीब लोक, मित्र, नातेवाईक यांना पैशाचे अमिश दाखवून त्यांच्या नावावर अनेक कंपन्या चालवतात. या कंपन्यामार्फत ही सर्व टॅक्स चोरी केली जाते. यामध्ये सबंधित विभागातील काही अधिकारी देखील सामिल असल्यामुळे यावर कोणत्याच प्रकारची कायदेशीर कारवाई होत नसल्यामुळे अनेक व्यापारी यांचे ग्राहक बनत असून सरकारचा कोट्यावधी रुपयाचा कर चुकविला जात आहे. या सर्व प्रकरणात रहमानी यांचे नातेवाईक मोहम्मद अहमद उर्फ आदिल रहमानी (कशफ ट्रेडींग कंपनी), आरिफ रहीमानी, राजेश सवाराम चौधरी, (आंबिका आर.एस एंटरप्रायसेस), अली रहिमानी, मनव्वर अजीज चौधरी यांचा समावेश असल्याचा आरोप केला आहे.
या रॅकेट मध्ये अनेक परप्रांतिय व उत्तर प्रदेशातील भंगार व्यावसायिकांचा आणि जीएसटी विभागातील काही अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे.
कुदळवाडी मधील अनेक व्यापाऱ्यांच्या आर्थिक व्यवहाराची कसुन चौकशी केल्यास अनेक प्रकरणे बाहेर येतील असेही पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीचे शहर उपाध्यक्ष गोपाल कच्छवे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!