महाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

पीसीयू मध्ये सिव्हील सर्व्हिस बीए या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १९ जून २०२४ पदवी मिळवल्यानंतर स्पर्धा परीक्षेत यश मिळवून सनदी अधिकारी होऊन देशसेवा करण्याचा मानस हजारो विद्यार्थ्यांचा असतो. यात यशस्वी होण्यासाठी अनेक विद्यार्थी क्लास लावतात. पण आता याची गरज नाही, आता सिव्हील सर्व्हिस साठी पिंपरी चिंचवड विद्यापीठ, साते, वडगाव मावळ येथे बीए अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. “बीए सोशल सायन्स इंटीग्रेटेड सिव्हील सर्व्हिसेस प्रीपरेशन” असा हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. पीसीयूच्या कुलगुरु प्रा. मनीमाला पुरी आणि प्र-कुलगुरु डॉ. सुदीप थेपडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, बारावीला मिळालेल्या मार्कांच्या आधारे या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो. अनेक विद्यार्थी योग्य मार्गदर्शनाच्या अभावी स्पर्धा परिक्षेत यश मिळवू शकत नाहीत. तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली ‘बीए सोशल सायन्स इंटीग्रेटेड सिव्हील सर्विसेस प्रीपरेशन’ या अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. याची प्रवेश प्रक्रिया सुरू असून या नाविण्यपूर्ण अभ्यासक्रमाची सुरुवात ऑगस्ट महिन्यात होणार आहे. यामध्ये लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी लागणारा संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. तीन वर्षात एकूण सहा सत्रांमध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल. तसेच नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना मल्टीपल इंट्री आणि मल्टीपल एक्झिटची मुभा उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्पा पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र, पदविका, पदवी मिळणार आहे.
या अभ्यासक्रमाची आखणी करण्यासाठी आजी – माजी सनदी अधिकारी, शिक्षण क्षेत्रातल्या तज्ञ, अनुभवी मार्गदर्शकांनी काम केले आहे. स्पर्धा परिक्षेसाठी लागणाऱ्या सर्व विषयांची सखोल मांडणी त्यात करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांचे नियमित मुल्यांकन करण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परिक्षेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. देशभरात स्पर्धा परिक्षांसाठी क्लासेसचं पेव फुटलं आहे. पिपंरी चिंचवड विद्यापीठाच्या बीए सोशल सायन्स इंटीग्रेटेड सिव्हील सर्विसेस प्रीपरेशन अभ्यासक्रमासाठी आजी – माजी सनदी अधिकारी शिकवायला येणार आहेत. शिवाय वर्कशॉप आणि वेबिनारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणावर भर देण्यात येणार आहे. शिवाय या विद्यार्थ्यांना राज्य सरकार, आजी – माजी सनदी अधिकारी आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना इंटर्नशीप देण्यात येणार आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळू शकेल. याद्वारे त्यांच्या नेतृत्त्व गुणाचा विकास ही साधता येणार आहे.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या अंतर्गत साते, वडगाव मावळ येथे निसर्गरम्य ठिकाणी मागील वर्षी सुरु झालेल्या पिंपरी चिंचवड विद्यापीठाने अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवला आहे. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मातई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पीसीयू मध्ये अनेक नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असेही आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!