महाराष्ट्रराजकीयविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

पिंपरी मधून सामाजिक न्याय विभागाच्या पदाधिकाऱ्यास उमेदवारी द्या – मयूर जाधव

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संवाद यात्रेचे आयोजन

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०६ जुलै २०२४ मागील सात वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना शिक्षण, पाणी, वाहतूक, आरोग्य, कचरा, प्रदूषण, बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी, महिला सुरक्षितता अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या सोडविण्यात राज्य सरकार व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे या सामान्य नागरिकांचा आवाज भ्रष्टाचारात बुडालेल्या आणि कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाच्या समोर मांडण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीने लवकरच शहरात सर्व परिसरातून संवाद यात्रा काढण्यात येणार आहे अशी माहिती सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष मयूर जाधव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
तसेच पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघातून सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मी अनेक सामाजिक उपक्रम राबविले असून आगमी विधानसभा निवडणुकीत मला उमेदवारी द्यावी अशी ही मागणी मी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती मयूर जाधव यांनी यावेळी दिली.
दहा ते बारा वर्षांपासून शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन पुरोगामी विचाराच्या पक्षामध्ये काम करायचे ठरवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय कामाला सुरुवात केली. यामध्ये मी शहरामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून २०१२ पासून काम केले आहे. माझ्या कामाची दखल घेऊन २०१७ पासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मला पक्षाने दिली. तसेच आता मी २०२१ पासून राज्यस्तरावर सामाजिक न्याय विभागामध्ये काम करीत आहे. मला २०२३ पासून आदरणीय शरद पवार साहेब यांनी सामाजिक न्याय विभागाचा शहराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. सामाजिक न्याय विभागाचे अंतर्गत विविध कार्यक्रम करून पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी मी नेहमी अग्रेसर राहिलो आहे. शहरातील अनेक कामगारांच्या कंपनीकडून पगार कपात व ग्रॅज्युटी संदर्भातल्या अडचणी आमच्या विभागाकडून सोडवण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरात मागासवर्गीयांच्या घरांवर कारवाई होणार होती त्या ठिकाणी त्यांचा हक्काचे घर जाऊ नये म्हणून कारवाई थांबवन्यासाठी पुढाकार घेतला. विद्यार्थी, तरुण, महिला, जेष्ठ अशा नागरिकांच्या अडचणी सोडवणं त्यासोबतच सामाजिक सलोखा निर्माण करत पक्ष संघटनेमध्ये जास्तीत जास्त लोकांना एकत्रित करत पक्षाची ताकद वाढवण्याचे काम मी व माझ्यासोबतच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे. तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने अनेक वर्षापासून आरोग्य शिबिर, विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तूंचे वाटप अशा कार्यक्रमाचे आयोजन करीत मातंग समाजातील युवक, युवतींना शिक्षण व उच्च शिक्षणासाठी मदत आणि मार्गदर्शन करीत आहे. माझ्यासोबत काम करणारे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि समाजातील बंधू, भगिनी यांनी मला पिंपरी विधानसभेतून उमेदवारी द्यावी अशी मागणी पक्षाच्या वरिष्ठांकडे केली आहे. मी देखील पिंपरी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. पक्षाच्यावतीने लवकरच माझ्या उमेदवारीची घोषणा होण्याचे संकेत देखील मला मिळाले आहेत.
आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार यांचे विचार तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि मागील सात वर्षांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत झालेला भ्रष्टाचार मतदार राजा पुढे मांडण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील आठही प्रभागांमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संवाद यात्रा देखील काढण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद वाढली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे असणारे चिन्ह घरोघरी पोहोचवणे, पवार साहेबांनी केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या अडचणी समजून घेणे सोबतच पक्षाचा प्रचार, प्रसार करून विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती करणे हा मुख्य उद्देश संवाद यात्रेचा असणार आहे.
देशा बरोबरच पिंपरी चिंचवड शहरातही पाणी, वाहतूक, पुणे शहराप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील व्हीआरटी प्रकल्प रद्द करणे व रस्ते मोठे करणे, हवेचे प्रदूषण, मुठा, पवना व इंद्रायणी नदीचे प्रदूषण, प्राथमिक व माध्यमिक शाळातील सुविधा वाढविणे, स्मार्ट सिटी प्रकल्पाचा उडालेला बोजवारा, आरोग्य, कचरा, वैद्यकीय, बेरोजगारी, महागाई, महिलांची सुरक्षा, गुन्हेगारी, कामगार कपात, ठेकेदारी पद्धतीने काम, झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांच्या समस्या, मध्यमवर्गीय कुटुंबांचे प्रश्न या सगळ्या प्रश्नांवर संवाद यात्रेच्या माध्यमातून लोकांना भेटून जनजागृती करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!