आरोग्यमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

गर्भवती महिला वॉर्डातल्या खाटेवरच झाली प्रसूत..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १३ जूलै २०२४ डॉक्टर, परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे निगडी येथील महापालिकेच्या यमुनानगर रुणालयात वॉर्डातल्या खाटेवरच गर्भवती महिला प्रसूत झाली. तब्बल चार तास असह्य वेदनांनी गर्भवती विव्हळत होती. मात्र, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर तसेच परिचारिका यांच्या कर्तव्य भावनेलाही पाझर फुटला नसल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या गंभीर प्रकाराबाबत महिलेच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या आयुक्तांकडे लेखी तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे.
संबंधित महिलेचे नातेवाईक दिपक खैरनार यांनी पिंपरी महापालिका आयुक्तांकडे त्याबाबत तक्रार केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, माझ्या वहिनीला दि.०३ जुलै रोजी पिंपरी महापालिकेच्या निगडी येथील यमुनानगर रुग्णालयातील प्रसूती विभागात प्रसूतीसाठी ऍडमिट करण्यात आले होते. यावेळी वहिनीसोबत माझी आई उपस्थित होती. दुपारी चार वाजेच्यानंतर वहिनीला मोठ्या प्रमाणात वेदना होऊ लागल्या. यावेळी वॉर्डातील डॉ. महेश दणाने तसेच सुप्रिया गायकवाड, प्रियांका साळवे व राजकन्या वानखेडे या तीन परिचारिका उपस्थित होत्या. त्यांनी जाणीवपूर्वक वहिनीकडे लक्ष दिले नाही. उलट माझी आई तसेच वहिनीला अवमानास्पद वागणूक देण्यात आली. तब्बल चार तासांपेक्षा जास्त वेळ होऊन देखील त्रास न थांबल्याने रात्री आठ वाजण्याच्या सुमारास असह्य वेदनांनी विव्हळत वहिनी ह्या वॉर्डातल्या खाटेवरच प्रसुत होत असल्याचे दिसल्यावर आईने डॉक्टरांना सांगितले नंतर रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकांनी प्रसूती केली. सुदैवाने कोणतीही अपरिहार्य घटना घडली नाही. यावेळी रुग्णालय परिसरात यमुनानगर रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. नासीर आल्वी हे बाजूच्या यमुनानगर रुग्णालयात होते. यावरून त्यांचे रुग्णालयात चालणाऱ्या गैरकारभारावर नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. या संपूर्ण प्रकारातून गर्भवतीला तसेच नवजात बालकाच्या जीविताला गंभीर धोका झाला असता, परंतु याची कुणीही दखल घेतली नाही. हे प्रकरण घडल्याच्या दुसऱ्या दिवशी या हॉस्पिटलच्या सिनियर इन्चार्ज जेनिफर शेफर्ड यांनी दोषी परिचारिकावर कारवाई करणे अपेक्षित होती, परंतु त्यांनी केवळ या घटनेची माहिती घेतली, व परिचारिकांना समज देऊन सोडून दिले. याच रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे अनेक चुकीचे प्रकार घडलेले आहेत. परंतु महापालिका प्रशासनाकडून दोषींवर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. तरी या गंभीर तक्रारीची तात्काळ दखल घेऊन यातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
कंत्राटी डॉक्टर, परिचारकांचा भोंगळ कारभार; यमुनानगर रुग्णालय ‘सलाईनवर’
यमुनानगर रुग्णालयात सायंकाळी प्रशासनाचा कोणीही जबाबदार व्यक्ती या ठिकाणी कार्यरत नसल्याने यामुळे गर्भवती महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून संपूर्ण रुग्णालयाचा कारभार हा ‘रामभरोसे’ सुरू आहे. या रुग्णालयात कंत्राटी स्वरूपात भरलेले डॉक्टर तसेच परिचारिकांच्या मनमानी कारभारामुळे अनेक गर्भवती महिलां व त्यांच्या नवजात बालकांच्या जीवावर बेतले आहे. यामुळे कंत्राटी कर्मचारी वर्गावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. रुग्ण सेवेचा बोजवारा उडाला असून रुग्णालय सलाईनवर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. असा आरोप पीडित महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!