Uncategorized

नेहरूनगरमधील ‘लीड” तुमच्या कायम लक्षात राहील – हनुमंतराव भोसले

नेहरूनगरच्या स्नेह मेळाव्यामध्ये अजित गव्हाणे यांना निवडून आणण्याचा निर्धार..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरी विधानसभा दि. २५ ऑगस्ट २०२४ येणारा काळ वैऱ्याचा असून आपल्याला सावध राहायचे आहे. तुम्हाला मटन खायला घालतील. देवदर्शन करून आणतील पण आपल्या मनात जे आहे तेच करायचे. नेहरूनगर हे एक कुटुंब आहे. या कुटुंबाने एकदा ठरवले एखाद्याच्या मागे ठामपणे उभे रहायचे तर हे कुटुंब मागे हटत नाही. हे मी गेल्या ४० वर्षाच्या अनुभवावर सांगत असल्याचे माजी महापौर हनुमंत भोसले म्हणाले. भोसरी मतदारसंघातील नेहरूनगर या भागातून भरघोस मतांनी नागरिक अजित गव्हाणे यांना निवडून आणतील. नेहरूनगरमधून मिळालेले लीड तुमच्या कायम आठवणीत राहील असेही हनुमंत भोसले यावेळी म्हणाले.
नेहरूनगर येथील साई मंदिरामध्ये शनिवारी दि.२४ स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला माजी स्थायी समिती सभापती अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले, माजी नगरसेवक पंकज भालेकर, समीर मासुळकर, विनायक रणसूभे, तसेच नजीर तरासगर, संजय उबाळे, संजय उदावंत, युवराज पवार, डॉ. नितीन लोंढे, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य निवृत्ती शिंदे, शांताराम शिंदे, नंदकुमार शिंदे, सचिन गायकवाड, जयंत शिंदे, रशीद पिरजादे, मदनशेठ चौधरी, सोन्या बापू तरटे, सतिश भोसले, अमित भोसले, ऋषीकेश भोसले, किशोर शिंदे, आदि उपस्थित होते.
यावेळी हनुमंत भोसले म्हणाले, १९७८ पासून मी समाजकारणात काम करत आहे. गेली ४० वर्षाहून अधिक काळ राजकीय क्षेत्रात काम केले आहे. नुकतेच ऐकले की, भोसरी विधानसभेतील कोणाचे २०० कोटीचे हॉटेल परदेशात आहे. हे ऐकूनच धडकी भरते. लोकांनी दिलेल्या वर्गणीवर मी एकेकाळी निवडणूक लढवलेली आहे. जेव्हां असे कोट्यावधींचे आकडे ऐकतो तेव्हा नवल वाटते. अनेक जण मला विचारतात, तुम्ही दोन नंबरने पैसा का कमवला नाही? तेव्हा मी सांगतो “मी दोन नंबरने पैसा कमावला असता तर माझी मुले आज एक नंबरला राहिली नसती. त्यामुळे पैशाच्या मागे न लागता समाजासाठी, समाजाचे ऐकत काम करावे लागते. हेच संस्कार मी अजित गव्हाणे यांच्यामध्ये पाहत आहे. त्यांचे वडील नगरसेवक होते. शिवाय एका बँकेचे उच्चपदस्थ अधिकारी देखील होते. त्यामुळे सुशिक्षितपणा, संस्कार त्यांच्या रक्तात आहेत.

आताची निवडणूक वेगळी आहे असे सांगत हनुमंत भोसले यांनी नागरिकांना जागृत राहण्याचे आवाहन केले. कोणी काही म्हणू दे, जागृत राहून सावधगिरीने आपले काम करायचे “हक्काचे सोडून पळत्याच्या मागे लागायचे नाही” आपला स्वाभिमान जपणारा, आपली कामे करणारा आणि आपल्या भागाला विकासाच्या वाटेवर नेणाऱ्या उमेदवाराला आपल्याला विधानसभेत पाठवायचे आहे. आता अजित गव्हाणे यांच्या रूपाने आपल्याला असा उच्चशिक्षित, सुसंस्कृत कुटुंबाची पार्श्वभूमी असलेला, आपली कामे करणारा आणि आपल्या भागाला शांततामय वातावरण देणारा उमेदवार लाभला आहे. त्याच्यासाठी जीव ओतून काम करायचे आहे. आपल्या भागातून भरघोस मतांनी त्यांना पुढे न्यायचे आहे. आपण दिलेले लीड पुढच्या अनेक निवडणुकांमध्ये त्यांच्या लक्षात राहील असे काम आपल्याला करायचे आहे असे आवाहन भोसले यांनी नागरिकांना केले.

यावेळी राहुल भोसले म्हणाले, नेहरूनगर मधील नागरिक आखाड पार्टी, देवदर्शनाच्या ट्रीप अशा कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत. अनेक वर्ष त्यांनी एकनिष्ठ राहत आपली जबाबदारी काय हे दाखवून दिले आहे. त्यामुळे नेहरूनगरमध्ये प्रचारासाठी वेळ खर्च करू नका असा विश्वास राहुल भोसले यांनी दिला.

विनायक रणसुभे म्हणाले, नेहरूनगर भागामध्ये हनुमंत भोसले यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीने एकदा शब्द दिला तर तो शब्द पाळण्याची एकनिष्ठता येथील नागरिक दाखवतात हे अनेक निवडणुकांमधून आम्ही पाहिले आहे.

आमदाराचे नक्की काम काय?

माजी नगरसेवक समीर मासुळकर म्हणाले, भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये गेली दहा वर्ष येथील आमदारांनी केलेली कामे पाहिली तर प्रत्येक सुजाण नागरिकाला प्रश्न पडतो की आमदाराचे नक्की काम काय? गेल्या दहा वर्षात आमदारांनी कामाच्या नवीन प्रथाच सुरू केल्या आहेत. अजमेरा कॉलनीमध्ये आमदारांनी नुकतेच एका सोसायटी बाहेर पत्रे बसविण्याचे काम केले.

वडिलांनी सांगितले होते पदाचा उपयोग लोकांच्या हितासाठी..
यावेळी अजित गव्हाणे बोलले की स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना आपल्या कामाला कुठलेही गालबोट लागणार नाही याची काळजी घेतली. पद मिळाल्यानंतर वडिलांनी सांगितले होते हे पद लोकांच्या हितासाठी वापरायचे. कुठलेही चुकीचे काम करायचे नाही असे वडिलांनी खडसावले होते. म्हणूनच या मतदारसंघातील भ्रष्टाचार, दहशत, मनमानी पहायला मन तयार होत नाही. या भागातील विमानतळ बाहेर गेले. औद्योगिक प्रदर्शन केंद्राचे काम गेल्या दहा वर्षात पूर्ण झालेले नाही. महाराष्ट्राची मान झुकेल अशा घटना पिंपरी चिंचवड मध्येही डोके वर काढत आहे. या भागात प्रचंड वाहतुकीची कोंडी होत आहे. रस्ते चांगले नाहीत, कारण प्रत्येक ठिकाणी यांचा भ्रष्टाचार आहे. नव्हे यांची भागीदारीच आहे. ड्रेनेजची अवस्था इतकी बिकट आहे की पावसाळ्यात शहर पाण्याखाली जात आहे. त्यामुळे हे चित्र आता आपल्याला बदलायला लागणार आहे.
या स्नेहमेळाव्याला हजारोच्या संख्येने कार्यकर्ते व प्रभाग क्रमांक ०९ चे मतदार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!