आर्थिकघोटाळेमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पुतळा विटंबने प्रकरणी पालिका आयुक्तांसह ठेकेदारावर गुन्हे दाखल करा.

संभाजी ब्रिगेडची पोलीस महासंचालकांकडे तक्रार..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.१० सप्टेंबर २०२४ पिंपरी चिंचवड महापालिकेकडून मोशी येथे छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचे काम करण्यात येत आहे. या पुतळ्याच्या मोजडीला तडा गेल्याचे उघडकीस आलेले आहे. तसेच संभाजीराजांच्या पुतळ्याचे अनेक सुटे भाग अत्यंत गलिच्छ, सांडपाणी युक्त गवत झुडपांनी व्यापलेल्या जागेत ठेवल्यामुळे राष्ट्रपुरुष छत्रपती संभाजी महाराजांची विटंबना होत आहे. पुतळ्याचे पावित्र्य तसेच संरक्षित जागेत ठेवणे याची जबाबदारी महापालिका आयुक्त शेखर सिंह, पुतळ्याच्या कामाचे ठेकेदार धनेश्वर कन्स्ट्रक्शन, मूर्तिकार राम सुतार, सल्लागार क्रिएशन कन्सल्टन्सी, शहर अभियंता मकरंद निकम, तत्कालीन कार्यकारी अभियंता संजय घुबे, विद्यमान कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार यांची होती. पुतळ्याच्या विटंबनेस कारणीभूत ठरणारे तसेच पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोरात-कठोर कारवाई करण्यात यावी तसेच याप्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, पुणे जिल्हाधिकारी, पुणे विभागीय आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील मोशीत उभारल्या जाणाऱ्या शंभूसृष्टीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा सुमारे शंभर फूट उंच पुतळा कांस्य धातूमध्ये उभारला जाणार आहे. शंभर फूट उंच पुतळा तयार करणे ही साधीसुधी बाब नाही. हा पुतळा अनेक भागांमध्ये बनणार, सगळे भाग तयार झाल्यावर त्याचे जोडकाम होईल व तदनंतर पुतळा तयार होईल. पण मग हे सुटे भाग कसे ठेवायचे, त्यांची निगा कशी राखली जाईल. यासाठी सुरक्षित जागेची निवड करणे. या संपूर्ण बाबींची जबाबदारी तसेच चौथरा आणि पुतळा उभारणीचे काम मूळ ठेकेदार धनेश्वर कन्स्ट्रक्शन यांच्यावर आहे. तर धनेश्वर कन्स्ट्रक्शन यांनी पुतळा बनवण्याचे काम पोट ठेकेदार म्हणून मूर्तिकार राम सुतार यांना दिले आहे. या कामासाठी सल्लागार म्हणून क्रिएशन कन्सल्टन्सी हे नेमण्यात आलेले आहेत. मात्र, यापैकी कोणीही पुतळ्याचे सुटे भाग ठेवण्यासाठी आगर त्यांची साठवणूक करण्यासाठी संरक्षित जागा निर्माण केली नाही. शंभूराजांच्या पुतळ्याचे सुटे भाग हे कोणत्याही सुरक्षेशिवाय अत्यंत गलिच्छ, सांडपाणी युक्त गवत झुडपांनी व्यापलेल्या जागेत ठेवण्यात आलेले आहेत. तसेच या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या पुतळ्याच्या मोजडीला तडे गेलेले आहेत. शेकडो टन वजनाचा पुतळा ज्या पायावर उभारला जात आहे, त्या पायांनाच तडे जात असतील तर कामाची गुणवत्ता कोणत्या प्रकारची असेल याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. पुतळ्याच्या कामाचा अनुभव नसतानाही धनेश्वर कन्स्ट्रक्शन या संस्थेस निविदेत सोयीनुसार अटी-शर्ती टाकून काम देण्यात आले. चौथऱ्याच्या कामापोटी महापालिकेने ठेकेदाराला दिलेले पाच कोटी व नवीन चौथऱ्याचे वाढलेले पाच कोटी, असा सुमारे दहा कोटी रुपयांचा जादाचा जो बोजा महापालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे. ज्या नवीन जागेत महापालिकेकडून चौथऱ्याचे काम करण्यात येत आहे, त्या जागेची मालकी अद्यापही महापालिकेकडे नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन कशा प्रकारे ठेकेदाराच्या तुंबड्या भरण्यात व्यस्त आहे, हे दिसून येत आहे.
दरम्यान अलीकडेच मालवण येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण आहे. त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड मध्येही छत्रपती संभाजी राजांची होत असलेली विटंबना ही अत्यंत खेदाची बाब आहे. यातून छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची पवित्र्यता राखली जात नसून त्यांची विटंबना होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याची विटंबनेस कारणीभूत ठरणारे तसेच पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणारे मनपा आयुक्त व इतर दोषी अधिकारी, शिल्पकार, ठेकेदार तसेच सल्लागार यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आलेली आहे. निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे, जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते, कार्याध्यक्ष लहू लांडगे, जिल्हा सचिव गणेश कुंजीर, शहर सचिव रावसाहेब गंगाधरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!