भोसरी विधानसभामहाराष्ट्रराजकीयविशेषसामाजिक

आखाड पार्ट्यांमधून तरुणांना झिंगविणाऱ्यांना प्रभू श्रीरामांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? – वसंत बोराटे

माजी महापौर म्हणून मिरवणाऱ्यांच्या अकलेची कीव येते – वसंत बोराटे

प्रतिनिधी भोसरी विधानसभा ०१ नोव्हेंबर २०२४ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध कामात भ्रष्टाचार करून रिचवलेला कोट्यावधींचा पैसा आखाड पार्ट्यांमधून कोणी खर्च केला हे भोसरी मतदारसंघांमध्ये वेगळे सांगायची गरज नाही. आखाडात वीस हजारांच्या पंक्ती उठवल्या असे सांगणाऱ्यांनी प्रभू श्रीरामांचे, हिंदू असल्याचे दाखले द्यावेत . आखाड पार्ट्यांमधून तरुणाईला झिंगवणाऱ्या सत्ताधार्‍यांना प्रभू श्रीरामच अद्दल घडवणार आहे. त्यामुळे प्रभू श्रीरामांचे दाखले देऊन राम कृष्ण हरी या अद्भुत मंत्राला उच्चारू नका असे म्हणणाऱ्या माजी महापौर राहुल जाधव यांच्या अकलेची कीव येते अशी घणाघाती टीका माजी नगरसेवक वसंत बोराटे यांनी केली आहे.
याबाबत वसंत बोराटे यांनी माजी महापौर राहुल जाधव यांचा खरपूस समाचार घेतला आहे. भोसरी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे ‘राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी’ अशा घोषणा देत मते मागितली जात आहेत. असे माजी महापौर राहुल जाधव यांचे म्हणणे आहे. कुठलीतरी पुराणातली वांगी बाहेर काढून त्याची जोड राम कृष्ण हरी या अद्भुत मंत्राला देऊन माजी महापौर जाधव यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. एकीकडे हिंदू म्हणून घ्यायचे आणि दुसरीकडे समस्त भोसरी मतदारसंघात आखाड पार्ट्या करत फिरायचे, तरुणांना दारू पाजायची असले उद्योग करणाऱ्यांनी दुसऱ्यांना अक्कल शिकवावी ही मोठी शोकांतिकाच आहे.
वसंत बोराटे पुढे म्हणाले भोसरी मतदारसंघातील राजकीय वातावरण फिरले आहे याची प्रचिती पदोपदी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना येत आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत राजकारण आणण्याचा त्यांच्याकडून खटाटोप केला जात आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ‘राम कृष्ण हरी वाजवा तुतारी’ या घोषणेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
खरे तर राम कृष्ण हरी’ हा मंत्र वारकरी वांरवार म्हणतात, कारण साक्षात पांडुरंग संत तुकाराम महाराज यांच्या स्वप्नात आले होते, त्यांनी हा मंत्र तुकोबांना सांगितला अशी आख्यायिका पूर्वपार सांगितली जात आहे. तेव्हापासून ‘राम कृष्ण हरी’ या मंत्राला गुरूमंत्र असे म्हटले जाऊ लागले. वारकरी संप्रदायात ‘राम कृष्ण हरी’ या मंत्राला खूप महत्त्व आहे. संत तुकाराम महाराज अखंडपणे या मंत्राचा जप करत त्यामुळे प्रत्येक वारकरी राम कृष्ण हरी असे म्हणत असतो. दुःख, वेदना, त्रास आणि संकटं हे सगळं काही विसरून विठोबाच्या नामस्मरणात लीन होण्याची ताकद ‘राम कृष्ण हरी’ या मंत्रात आहे.राम कृष्ण हरी’ या मंत्रात राम, कृष्ण आणि हरी या मंत्रात तीन देवतांचा उल्लेख आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील तुतारी हे केवळ राजेशाही परंपरांशी जोडलेले नसून , आपल्या देव देवता, इतिहासातील महान पराक्रमी राजे यांचे आगमन तसेच त्यांचा पराक्रम सांगताना तुतारी फुंकली जात असे.
अशी सर्व पार्श्वभूमी राम, कृष्ण, हरी या मंत्रामध्ये आणि तुतारी या वाद्यामध्ये असताना माजी महापौर राहुल जाधव यांना यात वावगे वाटावे म्हणजे जाधव यांच्या अकलेची कीव करण्यासारखे आहे. जाधव यांचा बोलवता धनी वेगळा आहे हे सांगण्याची गरज नाही असे देखील बोराटे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!