आपल्या विचाराचे सरकार राज्यात येण्यासाठी आपला उमेदवार निवडून यायलाच हवा – खासदार श्रीरंग बारणे
महायुतीचा ‘महा’मेळावा अन् आमदार अण्णा बनसोडे यांच्या विजयाचा ‘महा’निर्धार
प्रतिनिधी पिंपरी विधानसभा दि. ०६ नोव्हेंबर २०२४ केंद्रात आणि राज्यात समविचारी सरकार असणे जनतेच्या हितासाठी चांगले असते. असे सरकार नसेल तर राज्याची प्रगती थांबेल. आपल्याला तसे होऊ द्यायचे नाही. आपल्या विचाराचे सरकार राज्यात येण्यासाठी आपला उमेदवार निवडून यायलाच हवा. त्यामुळे महायुती मधील सर्व घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी पिंपरी मधून अण्णा बनसोडे आणि चिंचवड मधून शंकर जगताप यांना निवडून आणणे गरजेचे असल्याचे मत खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले.
महायुतीचे पिंपरीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे आणि चिंचवडचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात खासदार श्रीरंग बारणे बोलत होते. महायुतीच्या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, अमित गोरखे, सदाशिव खाडे, प्रशांत शितोळे, आर एस कदम, मंगला कदम, चंद्रकांता सोनकांबळे, श्रीमती पठाण, कविता अल्हाट, महेश कुलकर्णी, गोरक्ष लोखंडे, राजेश पिल्ले, सुजाता पालांडे, बाळासाहेब वाल्हेकर, निलेश तरस, कुणाल वाव्हाळकर, सुरेश निकाळजे, अजिज शेख, सिकंदर सूर्यवंशी, कमल कांबळे, जितेंद्र ननावरे, प्रमोद कुटे, राजेश वाबळे, सरिता साने, राजेंद्र तरस, राजू दुर्गे, माऊली थोरात, शितल शिंदे, शाम लांडे, विश्वजित बारणे, संदीप वाघेरे, तुषार हिंगे, काळुराम पवार, शैलजा पाचपुते, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “पिंपरी आणि चिंचवड मधून महायुतीचे उमेदवार निवडून येतील. या मतदारसंघात महायुतीला मानणारा मोठा मतदार आहे. उमेदवार त्यांच्या पद्धतीने प्रचार करतील. पण इतर सर्व जबाबदारी आपल्याला स्वीकारली पाहिजे. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही जोमाने काम करू. ज्या उमेदवारांनी उमेदवारी मागे घेऊन एकत्रित जाण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे आभार.
जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या आता होऊ देऊ नका. लोकसभा निवडणुकीत जातीचा किडा जनतेच्या डोक्यात सोडण्याचे काम झाले. ते आता होऊ देऊ नका. नकारात्मक विचार समोर येतील, त्याकडे फार लक्ष देऊ नका. ही निवडणूक महत्वाची आहे. टिका करण्यात वेळ घालवू नका. मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढण्याचे आवाहन खासदार बारणे यांनी केले.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले, “कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन महायुती मधील पक्षांबद्दल, महायुतीने घेतलेले निर्णय, योजना याबाबत माहिती द्यावी. लाडकी बहीण योजना सर्वांपर्यंत पोहोचवा. पिंपरी चिंचवड शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम अजित पवार यांनी केले आहे. त्यामुळे आपण आपले काम घेऊन लोकांपर्यंत जावे. तीनही मतदारसंघात आपल्याला महायुतीचे उमेदवार विजयी करायचे आहेत.”
महायुतीचे पिंपरीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, “मला पुन्हा संधी दिल्याबद्दल सर्व वरिष्ठांचे आभार. उमेदवारी माघारी घेतलेल्या 21 पैकी 19 जणांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. झालं गेलं विसरून जाऊ. जनतेच्या कामांसाठी एकत्रित काम करू. कुणाचीही गैरसोय होणार नाही, याची मी कायम खबरदारी घेईन. निवडणुकी नंतर आपले रुसवे फुगवे आणि हक्काची भांडणे आपण सोडवू. आमदार अमित गोरखे यांना विधान परिषदेवर संधी मिळण्यासाठी मी शिफारस केल्याची आठवण आमदार अण्णा बनसोडे यांनी करून दिली.
महायुतीचे चिंचवडचे उमेदवार शंकर जगताप म्हणाले, “शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार जिंकून येतील. आता आपण मताधिक्य वाढविण्यासाठी काम करायचे आहे. कुणीही गाफील न राहता हेवेदावे सोडून एक दिलाने काम करून महायुतीची ताकद वाढवायची आहे.”
आमदार उमा खापरे म्हणाल्या, “कार्यकर्त्यांनी आपले चिन्ह प्रत्येकापर्यंत पोहोचवावे. केवळ सभा आणि बैठकांना न जाता घराघरापर्यंत जाऊन आपले काम पोहोचवावे. वेळ कमी आहे. गाफील राहू नका. जोमाने काम करा. महायुती सरकारने केलेली कामे घराघरात पोहोचवा. जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन खापरे यांनी केले.
आमदार अमित गोरखे म्हणाले, ” अण्णा बनसोडे यांनी केलेले काम आणि महायुतीची साथ यामुळे त्यांच्यामध्ये निवडून येण्याचा विश्वास आहे. महायुतीची कामे घेऊन आपण घरोघरी गेलं पाहिजे. महायुती भक्कम राहण्यासाठी काही उमेदवारांनी माघार घेतली. त्यांचे विशेष कौतुक आणि सन्मान आपण राखला पाहिजे.”
आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे म्हणाल्या, “अजित दादांचा अण्णा बनसोडे यांच्यावर खूप विश्वास आहे. अण्णा बनसोडे यांच्यासाठी अजित दादांनी खूप केले आहे. असा नेता मिळणे ही अण्णांचे भाग्य आहे. माझ्या सुखदुःखात शेवट पर्यंत साथ देणाऱ्या अण्णा बनसोडे यांना मी उमेदवारी देणार असल्याचे दादांनी जाहीर केले आणि त्यांना उमेदवारी दिली. आम्ही अर्ज माघारी घेण्यासाठी सर्वांनी शिष्टाई केली. त्यामुळे आम्ही अर्ज माघारी घेतला. वरिष्ठांचा आदेश मानून आता महायुतीचे काम जोमाने करणार आहे.”
शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश तरस म्हणाले, “प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने घराघरात जाऊन शासनाने राबवलेल्या योजना, उपक्रमाबाबत माहिती द्यावी. या योजना सुरू राहण्यासाठी पुन्हा महायुतीला विजयी करण्याचे मतदारांना आवाहन करावे. महायुतीने शहरात केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा.”
गोरक्ष लोखंडे म्हणाले, “काम करणाऱ्या लहान लहान कार्यकर्त्यांना महायुती बळ देऊन त्याला सन्मान देते. अण्णा बनसोडे या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अजित पवार यांनी संधी दिली. त्यातून शहराला चांगले नेतृत्व मिळाले आहे. हेच नेतृत्व पुन्हा निवडून द्यायचे आहे.”
आरपीआयचे बाळासाहेब भागवत म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला जागा मिळाली नाही. पण पुढील निवडणुकीत आम्हाला न्याय मिळाला पाहिजे.
आरपीआयचे कुणाल वाव्हाळकर म्हणाले, “पिंपरी मधून आमदार अण्णा बनसोडे जिंकून येतील, असा विश्वास आहे. चिंचवड आणि भोसरी मधून देखील महायुतीचे उमेदवार निवडून येतील. आरपीआयचा प्रत्येक कार्यकर्ता मनापासून काम करत आहे.”
शिवसेनेचे राजेश वाबळे म्हणाले, “लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीने एकमताने काम केले. त्यामुळे महायुतीचा खासदार आपण निवडून दिला. तसेच एकत्रित काम विधानसभेच्या निवडणुकीत देखील करायचे आहे. कार्यकर्ता दुखावला जाणार नाही, याची प्रत्येक वरिष्ठाने खबरदारी घ्यावी.”
भाजपचे राजू दुर्गे म्हणाले, “आमदार अण्णा बनसोडे यांना तिसऱ्यांदा आमदार करायचे आहे. प्रत्येकाने आपापल्या प्रभागात, बूथ मध्ये लक्ष द्यावे. प्रत्येकाने आपला बूथ जिंकण्यासाठी प्रयत्न करावेत. आपला बूथ जिंकला तर उमेदवार जिंकणार आहे.”