सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या लंच ब्रेकला शासनाने लावला वेळेचा ब्रेक बघा अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोणाला दिले कठोर निर्देश..
प्रतिनिधी रेणुका गायकवाड – महाले नाशिक दि. ०७ नोव्हेंबर २०२४ साहेब कधी भेटणार, अजून किती वेळ लंच ब्रेक चालेल ? प्रत्येक शासकीय कार्यालयात दुपारी ०१ ते ०४ या वेळेत आपल्या आजूबाजूला हमखास ऐकू येणारे हे परिचित वाक्य !
सामान्य नागरिक कामानिमित्त एखाद्या शासकीय कार्यालयाला जेंव्हा भेट देतो तेंव्हा दुपारच्या वेळी संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी त्यांच्या कार्यालयात अथवा टेबलावर उपलब्ध दिसत नाही, कार्यालयीन वेळेत मिस्टर इंडिया झालेल्या या महोदयांबद्दल जेंव्हा नागरिक विचारतात तेव्हा मात्र ऑफिसचा लंच ब्रेक आहे, साहेब जेवायला बसले, त्यांचा लंच झाल्यावर तुम्हाला बोलावतो, जेवणाची सुट्टी आहे दोन तासांनी या..असे सांगितले जाते.
कधी तर काही कामचुकार अधिकारी व कर्मचारी लंच ब्रेक नंतर गायब झालेले दिसतात आणि त्यांच्याच कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांना यासंदर्भात विचारल्यावर आपल्याला उडवा उडवीचे उत्तर देऊन उद्या या असे सांगण्यात येते.
अनेकदा तर काही शासकीय कार्यालयामध्ये तुम्ही लंच टाईम मध्येच का येता ? सकाळी लवकर येता येत नाही का ? असेही सुनावले जाते.
स्वतःचा अमूल्य वेळ आणि पैसा देऊनही अशा कामचुकार सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे अनेक नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.
” मग त्यावेळी मनात एक त्रस्त नागरिक म्हणून अनेक प्रश्न येतात”…..
पूर्ण पगार घेणाऱ्या मात्र कामाच्या वेळेत गायब राहणाऱ्या या अधिकाऱ्यांचे करायचे काय ?
शासन नियमानुसार काय आहे बरं मध्यान्ह भोजनाची वेळ ?
लंच ब्रेकच्या नावाखाली नागरिकांना दोन – दोन तास वाट बघायला लावणाऱ्या व जाणीवपूर्वक मनस्ताप देणाऱ्या या कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांची तक्रार कोठे व कशी करावी ?
चला तर माहिती करून घेऊया जर तुम्हालाही भविष्यात कधी असा वाईट अनुभव आलाच तर एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही कसा तोडगा काढाल ? आणि आपल्या परिसरातील सरकारी विभागातील अशा कामचुकार अधिकारी व कर्मचारी यांना कसा धडा शिकवाल…
नुकतंच अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी श्री. सिद्धराम सालीमठ यांनी ज्येष्ठ समाजसेवक व माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. योगेंद्र सांगळे यांच्या तक्रारीवरून अहिल्यानगर या जिल्ह्यामधील सर्व शासकीय विभागांना दिनांक २४/१०/२०२४ रोजी महत्त्वपूर्ण आदेश निर्देशित केले…
काय होती तक्रार ?
1) अहिल्यानगर जिल्ह्यात केंद्र व राज्य सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचारी वेळेत येत नाहीत तसेच मध्यान्ह भोजनाच्या वेळेचे पालन करत नसलेबाबत…
2) महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक 2016/प्र.क्र62/18 (र.व.का) मंत्रालय मुंबई दिनांक 24 फेब्रुवारी 2020 चे पालन होत नसले बाबत…
सदर तक्रारी अर्जावर जिल्हाधिकारी यांचेकडून तत्काळ दखल घेण्यात आली, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी श्री सिद्धाराम सालीमठ यांनी शासन नियमानुसार तक्रारी अर्जावर काय निर्देश दिले याची माहिती पुढील प्रमाणे-
1) जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी जिल्ह्यातील 52 विभागांना थेट लेखी आदेश देऊन कार्यालयीन वेळेत अधिकारी व कर्मचारी यांनी नेहमी हजर राहावे अशा सूचना केल्या
2) मध्यान्ह भोजन वेळ ही 30 मिनिटापेक्षा अधिक ची वापरू नये असे लेखी निर्देश संबंधित सर्व 52 विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना दिले.
🔚ला जाणून घेऊया शासनाने निर्देशित केलेले नियम व शासन निर्णय –
1) 31 ऑगस्ट 1988 च्या शासन निर्णयानुसार बृहमुंबई आणि मुंबई बाहेरील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची वेळ निश्चित करण्यात आली आहे, कार्यालयीन वेळेत जेवणाची सुट्टी केवळ अर्ध्या तासाची असेल हे स्पष्ट करण्यात आलेला आहे
2) 18 सप्टेंबर 2001 च्या शासन निर्णयानुसार मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची दुपारची वेळ 1 ते 2 या वेळेत फक्त अर्धा तासाची असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.,
विविध कार्यालयामध्ये जेवणाची वेळ संबंधित कार्यालयाने आपल्या सोयीनुसार ठरवल्याने जनतेची गैरसोय होत असल्याची तक्रार आहे त्यामुळे यापुढे जेवणाची वेळ एक ते दोन या वेळेतच फक्त अर्धा तासाची असावी आणि एकाच वेळी सर्व अधिकारी व कर्मचारी जेवणासाठी जाणार नाहीत याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुख यांची असेल असेही जीआर मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
3) कार्यालयीन वेळेमध्ये मोबाईल मध्ये वेळ वाया घालवणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध केलेल्या तक्रारीवर चौकशी केली असता असे निदर्शनात आले की कार्यालयीन वेळेत अनेक कर्मचारी स्वतःच्या जागेवर किंवा बाहेरील मोकळ्या जागेत बराच वेळ मोबाईलवर बोलत असल्याचे किंवा मोबाईल वर चॅटिंग करणे गेम खेळणे इत्यादी मध्ये वेळ दडवत असतात किंवा याबाबत अधिकाऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असेही निर्देश शासनाकडून देण्यात आले आहे.
4)संबंधित शासन निर्णयाचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही याची जबाबदारी संपूर्णपणे संबंधित विभाग प्रमुखावर आहे परंतु तरीही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात येतात तातडीने ही बाब नागरिकांनी संबंधित विभाग प्रमुखाच्या निदर्शनात आणून देणे ही गरजेचे आहे.
जनतेशी थेट संबंध येत असलेल्या कार्यालयांमध्ये जेव्हा नागरिक त्यांच्या विविध समस्या घेऊन येतात तेव्हा संबंधित अधिकारी व कर्मचारी जागेवर उपलब्ध नसतात विविध उत्तरे देऊन नागरिकांचा मनस्ताप वाढवला जातो याच्याच विरोधात आवाज उठवणाऱ्या अहिल्यानगरचे ज्येष्ठ समाजसेवक श्री योगेंद्र सांगळे यांनी केलेल्या तक्रारीवर व झालेल्या कारवाईवर थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले आहे : वर्षानुवर्ष सरकारी कार्यालयामधील अधिकारी आणि कर्मचारी वेळेत हजर न राहणे तसेच मध्यम भोजन वेळेत परत न येणे अशा विविध कारणांमुळे अहिल्यानगर मधील सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता असे माझ्या निदर्शनात आले व मी या समस्येवर प्रकाश टाकण्याचे ठरवले व अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी श्री. सिद्धराम शालीमठ यांना थेट लेखी तक्रार करून या संबंधित माहिती दिली, माननीय जिल्हाधिकारी यांनी माझ्या तक्रारी अर्जावर अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास 52 विभागांना थेट लेखी आदेश दिले व कार्यालयीन वेळेतच हजर राहावे तथा मध्यान्ह भोजनाची वेळ 30 मिनिटापेक्षा अतिरिक्त वापरू नये असे लेखी निर्देश दिले.
जिल्हाधिकारी यांच्या या निर्देशामुळे नक्कीच सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल अशी आशा आहे, माननीय जिल्हाधिकारी यांनी तत्काळ केलेल्या कार्यवाहीमुळे मी त्यांचे आभार व्यक्त करतो.
श्री. सांगळे यांनी महाराष्ट्रातील सामान्य नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांना आवाहन केले आहे की आपल्या जिल्ह्यामध्येही जर अशाप्रकारे शासकीय विभागांमध्ये गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनात येताच तत्काळ संबंधित विभाग प्रमुखांना तक्रार करावी, तक्रारीचा नियमित पुरवठा करावा, कामचुकार कर्मचारी व अधिकाऱ्यांना शासकीय नियमानुसार काम व वर्तुणुक करण्यासंदर्भात स्पष्ट कळवावे, ज्यामुळे आपल्याबरोबरच इतर नागरिकांचाही मनस्ताप कमी होईल.
आजच्या लेखामध्ये आपण कामचुकार सरकारी कर्मचारी व अधिकारी यांच्यावर एक सामान्य नागरिक शासन नियमानुसार कसा वचक बसवू शकतो याची माहिती घेतली…
अशा अनेक सामाजिक प्रश्नांवर अभ्यासपूर्ण माहिती सतत लेखाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यास आम्ही नेहमी कटिबद्ध असु…. पुन्हा भेटू एका नवीन सामाजिक विषयावर….