अभिवादनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

महानगरपालिकेच्या वतीने थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २० डिसेंबर २०२४ अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता निर्मुलनासाठी आपले आयुष्य व्यतीत करणारे संत गाडगेबाबा हे विज्ञानवादी दृष्टीकोन असलेले थोर समाजसुधारक होते, त्यांनी भजन कीर्तनाच्या माध्यमातून लोकशिक्षणाद्वारे स्वच्छतेचे व शिक्षणाचे महत्व लहानथोरांना पटवून दिले. त्यांच्या व्यापक विचारांचा वारसा भावी पिढ्यांनी जोपासला पाहिजे असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास उपआयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्य बन्सी पारडे, मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते नरेश कदम, सुनील अभंग, गजानन गवळी, विशाल जाधव, सुनील पवार, सतीश राऊत, किशोर रोकडे, राम शिंदे, संतोष गोतावळे, वैशाली राऊत, दयानंद अभंग, अशोक शिंदे, नाना सोनटक्के, बाळासाहेब वाघ आदी उपस्थित होते.
संत गाडगेबाबा यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात झाला. त्यांनी भजन किर्तनाच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करण्याचे काम केले. समाजप्रबोधन करण्यासाठी त्यांनी गावोगावी जाऊन लोकशिक्षणाचे कार्य केले, लोकांनी दिलेल्या देणगीतून अनाथांसाठी अनाथालये, आश्रम तसेच धर्मशाळा आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाळाही बांधल्या. संत गाडगेबाबा यांच्या नावाने सर्वत्र स्वच्छता अभियान राबविले जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!