पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची बांधकाम प्रकल्पांसाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे !
बांधकाम प्रकल्पांसाठी पर्यावरणपूरक नियमावली जारी !
ध्वनी प्रदूषण टाळणे, जलसंधारणाला चालना, आणि कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी महानगरपालिकेचा पुढाकार
प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. २० डिसेंबर २०२४ पिंपरी-चिंचवड शहरामध्ये झपाट्याने औद्योगिकीकरण वाढते आहे. याचबरोबर शहरामध्ये मोठ्याप्रमाणात बांधकामांची संख्यासुध्दा वाढत असून महानगरपालिकेने नागरिकांना चांगले जीवनमान देण्याच्या हेतूने शाश्वत आणि पर्यावरणपूरक बांधकाम पद्धती स्वीकारली आहे. त्यासाठी पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोजी याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले. या परिपत्रकानुसार, सदर उपाययोजना नागरिकांच्या तक्रारींचा विचार करून आणि क्रेडाई (कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया) या संस्थेसोबत चर्चा करुन ठरविण्यात आल्या आहेत. शाश्वत शहरी विकासाला चालना देण्यासाठी या नवीन नियमांमध्ये ध्वनी प्रदूषण, जलसंधारण आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
चौकट :
आता शहरामध्ये रात्रीच्या बांधकामांवर बंदी…
शहरातील नागरिकांकडून करण्यात आलेल्या तक्रारींनंतर रात्री १० ते सकाळी ७ या वेळेमध्ये पिंपरी – चिंचवड हद्दीतील बांधकामांवर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच सर्व नवीन गृहनिर्माण प्रकल्पांसाठी वैयक्तिक पाणी मीटर बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे पाण्याच्या वापराचा वैयक्तिक स्तरावर मागोवा घेता येणार असून यामाध्यमातून पाण्याचा अपव्यय टाळता येणार आहे. याशिवाय, गृहनिर्माण युनिट्समध्ये बांधकाम व्यावसायिकांनी घराचा ताबा देताना एरेटर टॅप्स बसवणे देखील अनिवार्य करण्यात आले आहे.
चौकट :
मार्गदर्शक तत्वामध्ये बांधकाम व बांधकाम पाडणीच्या कचरा व्यवस्थापनावर भर…
पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेने बांधकाम आणि बांधकाम पाडणीच्या कचऱ्यासाठी दररोज १५० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे व्यवस्थापन केले आहे. नवीन नियमांनुसार बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या प्रकल्पातून मिळणाऱ्या किमान १० टक्के पुर्नप्रक्रिया केलेल्या वस्तू म्हणजेच पेवर ब्लॉक सारख्या रचना नसलेल्या वस्तू वापरासाठी घेणे बंधनकारक असेल. सदर परिपत्रकाचे बांधकाम व्यवसायिकांनी पालन न केल्यास त्यांना भोगवटा प्रमाणपत्र दिले जाणार नाही. असा सुध्दा नियमावलीमध्ये उल्लेख केला आहे.
कोट :
शहराच्या भविष्यासाठी व शाश्वत शहराच्या निर्माणासाठी महापालिकेची वाटचाल !
“नागरिकांच्या समस्या सोडवण्याबरोबरच पर्यावरणपूरक विकास आणि शाश्वत शहरी विकासासाठी आम्ही ही पावले उचलत आहोत. जलसंधारण, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक उपायांवर भर देऊन आम्ही भविष्यासाठी व शाश्वत शहर निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत.”
शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका