अभिवादनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

महानगरपालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध उपक्रमांद्वारे साजरी…

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. ०३ जानेवारी २०२५ स्त्रीमुक्तीसाठी अभूतपूर्व लढा देऊन सावित्रीबाई फुले यांनी सक्षमीकरण, स्वावलंबन आणि स्वाभिमानाची ज्योत महिलांमध्ये प्रज्वलित केली, त्यातून प्रेरणा घेऊन कर्तबगार महिला देश विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत. हे सावित्रीबाई फुले यांच्या समर्पित लढ्याचे यश आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त शुभेच्छा देताना ते बोलत होते.
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महिला शिक्षण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महापालिकेतील कार्यक्रमास उपआयुक्त अण्णा बोदडे, माजी नगरसेवक मारुती भापकर, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा दांडगे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी उज्वला गोडसे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल पुराणिक, उपअभियंता कविता माने, कार्यालय अधीक्षक मीनाक्षी गरुड, उपलेखापाल गीता धंगेकर, दीप्ती हांडे, वैशाली कलापुरे , दिपाली कर्णे, माया वाकडे, विजया कांबळे, संतोषी चोरगे, वनिता फुले, सुरेखा साळुंखे, सुरेखा सूर्यवंशी, कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष मनोज माछरे , बालाजी अय्यंगार, नितीन समगीर, यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मोशी येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास उपआयुक्त अण्णा बोदडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, उपआयुक्त राजेश आगळे, मोशी येथील महापालिका शाळेच्या मुख्याद्यापिका सुरेखा दांडगे, पोर्णिमा देवरे, उज्वला मरळे, सामाजिक कार्यकर्ते मनीषा आल्हाट, सायली शिंदे, पल्लवी सुरवसे आदी उपस्थित होत्या.
सावित्रीबाई फुले स्मारक येथील सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास उपआयुक्त अण्णा बोदडे यांनी पुष्पहार अर्पण करून प्रबोधन पर्वाचे उद्घाटन केले. यावेळी माजी नगरसेवक संतोष लोंढे, अभिमन्यू दहितुले, मारुती भापकर, माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, संभाजी गायकवाड, आनंदा कुदळे, विशाल जाधव, हिरामण भुजबळ, प्रल्हाद कांबळे, रामभाऊ दराडे, हनुमंत लोंढे, दत्ता लोंढे, प्रदीप पवार, विलास गावाडे, तुकाराम गायकवाड, वंदना जाधव आदी उपस्थित होते.
तसेच सावित्रीबाई फुले जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय भवनात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित विजय शिंदे यांनी रेखाटलेल्या रांगोळ्यांचे प्रदर्शन सुरु आहे. अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त एक दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या विचार प्रबोधन पर्वात सावित्रीबाई फुले यांच्यावर रचलेल्या गाण्यांचा कार्यक्रम, कविसंमेलन, परिसंवाद आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच उद्घाटनावेळी भोसरी शाळेच्या मुख्याद्यापिका मंगल आहेर गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थिनींनी गीत व नृत्याद्वारे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट प्रदर्शित केला. या विद्यार्थ्यांचा सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्राची माहिती देणारे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच उत्कृष्ट महिला बचत गटांचा सत्कार करण्यात आला. यानंतर टीव्ही स्टार शाहीर संतोष साळुंखे लातूरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित शाहिरी सादर केली. या कार्यक्रमानंतर शारदा मुंडे यांनी मी सावित्री फुले… हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर केला. तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व महिलांसाठी अभिनेते ओम यादव यांनी संवादमय सावित्रीच्या लेकी हा कार्यक्रम सादर केला.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी आणि हक्कासाठी तसेच जातीय भेदभाव दूर करण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिकेचा दर्जा देण्यात आला असून महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील महत्वाची व्यक्ती म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. असे मत सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अण्णा बोदडे यांनी सूत्रसंचालन प्रफुल पुराणिक यांनी केले तर आभार पौर्णिमा भोर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!